कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस सत्तेत येणार नाही!

दामू नाईक : भाजपमध्ये येण्यासाठी कामत यांनी दोनवेळा प्रयत्न केल्याचाही दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे याआधी भाजपमध्ये होते. आताही दोनवेळा त्यांनी भाजपच्या केंद्रातील नेत्यांशी संपर्क साधून भाजपमध्ये येण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्रातील भाजप नेत्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे त्यांनी भाजपवर बोलण्यापेक्षा काँग्रेस सांभाळावी. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पाहावं. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी यापुढे राज्यात काँग्रेस सत्तेवर येऊ शकणार नाही, अशी टीका प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी केली. दक्षिण गोवा भाजप जिल्हा कार्यालयात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रूपेश महात्मे आणि शर्मद रायतूरकर उपस्थित होते. काँग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी पत्रकातून भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करत नाईक यांनी त्यांचा निषेधही नोंदवला.

हेही वाचाः पल्लवी भगतांचा अपमान हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान

व्यक्ती हयात नाही, त्यांच्याबाबत आता बोलणं चुकीचं

प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी पत्रकातून केलेली टीका ही त्यांना कुणीतरी लिहून दिलेले भाष्य आहे. अशाप्रकारे इतिहासाची जाण नसलेल्या नव्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पुढे करत आहे. राजकीय नेता असो वा इतर कुणीही व्यक्ती असो, त्यांच्याविषयी बोलताना ताळतंत्र ठेवून बोलणं आवश्यक आहे. विरोधक असले तरीही त्यांनी लोकांसाठी केलेल्या कामाचा मान ठेवून बोलणं आवश्यक असतं. भाजपकडून विरोधी नेत्यांचाही उल्लेख योग्य प्रकारे केला जातो. जी व्यक्ती हयात नाही, त्यांच्याबाबत आता बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रिपदावर कार्य केलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांच्याबाबत बोलताना एकेरी शब्द वापरणं, हीन मानसिकतेचं लक्षण आहे, अशी टीकाही नाईक यांनी यावेळी केली.

हेही वाचाः उच्च शिक्षणासाठी नम्रताला होईल ती सगळी मदत करणार

भाजप नेत्यांवर नाहक टीका करू नये

विरोधी पक्षनेते कामत यांनी कोणालातरी पुढे काढून भाजप नेत्यांवर नाहक टीका करू नये. अन्यथा भाजपकडून त्यांना तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही नाईक यांनी दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!