कोरगाव सरपंच स्वाती गवंडी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव

9 पैकी 8 पंचसदस्यांकडून पेडणे तालुका गटविकास कार्यालयात नोटीस सादर

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः भाजप समर्थक आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कट्टर समर्थक असलेल्या कोरगाव सरपंच स्वाती गवंडी यांच्याविरुद्ध गुरुवारी आठ पंचसदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस पेडणे तालुका गटविकास कार्यालयात दिली.

हेही वाचाः प्रवीण आर्लेकरांचा इब्रामपूर – हणखणे ग्रामपंचायत दौरा

9 पैकी 8 पंचसदस्यांच्या अविश्वास ठराव नोटीसीवर सह्या

या अविश्वास ठराव नोटीसीवर कोरगाव पंचायतीतील नऊ पैकी आठ पंचसदस्याच्या सह्या आहेत. उमा साळगावकर, अब्दुल नाईक, प्रमिला देसाई, महादेव पालयेकर, उदय पालयेकर, समील भाटलेकर, वसंत देसाई आणि कुस्तान कुयेलो या आठ जणांनी सह्या केल्यात. या अविश्वास ठराव नोटीसीत सरपंच पंचायत वार्डाच्या विकासात लक्ष घालत नाहीत, सदस्यांच्या  प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरं देत नाहीत, पंचसदस्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र निर्णय घेतात, पंचायतीच्या कामात सहकार्य करत नाहीत अशी कारणं नमूद आहेत.

हेही वाचाः नुकसान भरपाई द्या; अन्यथा न्यायालयात जाऊ

कार्यकाळ संपण्यापूर्वीच अविश्वास ठराव

कोरगावाचं सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे. एकूण नऊ पंचसदस्य असलेल्या पंचायतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन पाच वर्षांपैंकी सुरुवातीची अडीच वर्षं प्रमिला देसाई, तर नंतरची अडीच वर्षं स्वाती गवंडी यांना सरपंचपद देण्याचं अलिखित करारानुसार ठरलं होतं. तर उपसरपंचपद हे पुरुषांसाठी असून चार पंचसदस्यांना ठराविक काळासाठी विभागून देण्याचं ठरलेलं. त्यानुसार आतापर्यंत सर्व सुरळीत सुरू होतं. मात्र स्वाती गवंडी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.

हेही वाचाः महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा विद्यापीठाकडून जाहीर

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखल केला अविश्वास ठराव

विधानसभा निवडणूकीसाठी पेडणे मतदारसंघात सध्या संभाव्य उमेदवारांनी जोमाने काम करायला सुरुवात केलीये. पेडणे मतदारसंघातील सर्वात मोठं क्षेत्र असलेल्या कोरगाव पंचायत क्षेत्राकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या पंचायत क्षेत्रात तसंच मतदारसंघात मिशन फॉर लोकलच्या बॅनर्र खाली राजन कोरगावकर काम करत असून कोरगाव पंचायतीचे माजी पंचसदस्य तथा हरमल जिल्हा पंचायत सदस्य म्हणून अपक्ष निवाडून आलेले रंगनाथ कलशावकर, माजी सरपंच उल्हास देसाई, पंच वसंत देसाई हेही राजन कोरगावकरांसोबत अधून मधून फोटोत दिसतात. तर काही पंचसदस्य मगोपचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोरगाव पंचायतीचे नऊ पंचसदस्य हे उपमुख्यमंञी बाबू आजगावकरांचे समर्थक होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही पंचसदस्य मिशन फॉर लोकलचे संभाव्य उमेदवार राजन कोरगावकर यांच्या संपर्कात असल्याने याबाबत बरीच चर्चा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!