नऊ मृत्यूंसह 324 करोनाबाधित

एकूण मृतांचा आकडा 360; सक्रिय संख्या 5 हजार 667

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : चोवीस तासांत राज्यातील आणखी नऊ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबळींची संख्या 360 झाली आहे. तर नवे 324 बाधित आढळले असून, 429 जणांनी करोनावर मातही केली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या 5 हजार 667 झाली आहे.
नव्या मृत्यूंत सावंतवाडी येथील 59 वर्षीय महिला, तसेच माशेल येथील 64 वर्षीय पुरुष, शिवोली येथील 62 वर्षीय पुरुष, पाळी येथील 69 वर्षीय पुरुष, डिचोली येथील 50 व 71 वर्षीय पुरुष, नावेली येथील 48 वर्षीय पुरुष, साळगाव येथील 70 वर्षीय पुरुष व गुळेली येथील 88 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नऊही मृतांना करोनासोबतच इतर गंभीर आजार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य खात्याने आपल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.
राज्यात आतापर्यंत 28 हजार 753 करोनाबाधित सापडले असून, त्यांतील 22 हजार 726 जण करोनामुक्त झाले आहेत. सरकारने दिलेल्या घरी अलगीकरणात राहण्याचा पर्याय आणखी 485 जणांनी स्वीकारला. त्यामुळे सद्यस्थितीत घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या 12 हजार 492 झाली आहे, असेही आरोग्य खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, राजधानी पणजीत दोन दिवसांत 35 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पणजीतील सक्रिय बाधितांची संख्या 328 झाली आहे. करंझाळे, सांतइनेज, टोंका, भाटले, रायबंदर या भागांत नवे बाधित सापडल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.

बरे होणार्‍यांचा दर 79.03 टक्के
राज्यातील करोनामुक्त होणार्‍यांचा दर वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी करोनातून बरे होणार्‍यांचा दर 79.03 टक्के इतका राहिला. गेल्या काही दिवसांपासून करोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. आगामी काळातही यात आणखी वाढ होईल, असा विश्वास आरोग्य खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!