स्थानबद्धता केंद्रात नायजेरियनांचा धुमाकूळ

कर्मचार्‍यांना दहा तास कोंडले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: मायदेशी परत पाठवण्यात वेळकाढूपणा सुरू असल्याच्या आरोपावरून बुधवारी दहा नायजेरियन नागरिकांनी म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात धुमाकूळ घातला. त्यांनी तेथील कर्मचार्‍यांना कोंडून ठेवलं. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.

स्थानबद्धता केंद्रात सध्या १२ पुरुष व ९ महिला मिळून २१ विदेशी नागरिक

स्थानबद्धता केंद्रात सध्या १२ पुरुष व ९ महिला मिळून २१ विदेशी नागरिक आहेत. त्यांपैकी दहा आंदोलक नायजेरियन सुमारे एक-दीड वर्षापासून केंद्रात आहेत. मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. कागदपत्रे पूर्ण होऊनही आम्हाला मायदेशी पाठवण्यास प्रशासन वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप या नायजेरियन नागरिकांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यापूर्वी या नागरिकांनी उपोषणास्त्रही उगारले होते. बुधवार, दि. २२ रोजी दुपारपासून पुन्हा या नायजेरियन नागरिकांनी केंद्रात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्थानबद्धता केंद्र याची दखल घेत नसल्याने केंद्राच्या दरवाजाला कडी लावली व दरवाज्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. केंद्रातील कर्मचार्‍यांना रात्री साडेदहापर्यंत आतच कोंडून ठेवलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस केंद्रात दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस केंद्रात दाखल झाले. त्यांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. केंद्राचे अधिकारी आणि विदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या अधीक्षकांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यास या आंदोलकांनी नकार दिला. रात्री उशिरापर्यंत आंदोलक कोंडून ठेवलेल्या कर्मचार्‍यांची सुटका करण्यास तयार नव्हते. विदेशी नागरिक नोंदणी विभागाने शेवटी उत्तर गोवा पोलिसांना मध्यस्थी करण्यासह आंदोलन मोडीत काढण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार रात्री १० वा. पोलीस अधिकार्‍यांनी स्थानबद्धता केंद्रात धाव घेतली. आंदोलकांची समजूत काढली. रात्री १०.३० वा. कोंडून ठेवलेल्या कर्मचार्‍यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर सुमारे दहा तास चाललेल्या या प्रकारावर पडदा पडला. रात्री ११ नंतर अतिरिक्त पोलीस बळ केंद्रात दाखल झाले.

वेठीस धरण्याचा प्रकार सुरू

स्थानबद्धता केंद्रातील विदेशी नागरिकांची खास करून बहुसंख्य नायजेरियन नागरिकांची गेल्या काही महिन्यांपासून केंद्रात दादागिरी सुरू आहे. अधिकारीवर्ग या लोकांना त्यांना मायदेशी पाठविण्यासंबंधीची योग्य माहिती देत नाहीत, प्रक्रियाही जलद करत नाहीत. यामुळे हे लोक केंद्रातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत, अशी माहिती या प्रकारानंतर समोर आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!