गोंयकरांनो आता गाडी चालवताना जपून! कारण…

सुधारीत मोटान वाहन कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख ठरली असून केंद्राने निश्चित केलेलाच दंड कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील वाहनचालकांसाठी आणि वाहन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सुधारित मोटार वाहन कायद्याची पुढील वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात 1 जानेवारी २०२१ पासून सुधारित मोटार वाहन कायदा लागू करण्यात येणार आहे. सुधारित कायद्यप्रमाणे वाढीव दंडात कोणतीही सूट दिलेली नाही. केंद्राने निश्चित केलेलेच दंड राज्य सरकारनेही तसेच ठेवले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यासंदर्भातील फाईलला मंजुरी दिल्याची खात्रीलायक माहिती वाहतूक खात्यातील सूत्रांकडून मिळाली आहे.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा 1988 मध्ये दुरुस्ती केली होती. त्यानुसार वाहतूक नियम उल्लंघन दंडात वाढ करण्यात आली आहे. दंडातील वाढ 1 सप्टेंबर 2019 पासून लागू केली आहे. राज्य सरकारने अद्याप या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. या कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्राने सप्टेंबर 2019 मध्ये राज्यांना दिले होते. गोव्यासह काही राज्यांनी कायद्याची अजून अंमलबजावणी केलेली नाही. काही राज्यांनी वाढीव दंडात काही प्रमाणात सूट देऊन अंमलबजावणी केली आहे. अखेर पुढील वर्षापासून या कायद्याची अंमलबजावणी होणार असल्यानं आता तरी वाहनचालकांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गोव्यात यापूर्वी सुधारित कायद्याची 2 वेळा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला होता. पण विरोधकांनी खराब रस्त्यांचा मुद्दा लावून धरत रस्ते गुळगुळीत होईपर्यंत कायदा लागू करु नये, अशी मागणी केली होती. अशातच मार्चपासून झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठं आर्थिक संकट सगळ्यांवर कोसळलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुधारित कायदा तत्काळ लागू न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर याआधी 1 ऑक्टोबरपासूनच या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचं निश्चित झालं होतं. पण करोनाची स्थिती जैसे थे असल्यामुळेच सुधारित कायद्याची नववर्षापासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केल्याचं कळतंय.

महत्त्वाचं म्हणजे सुधारित मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम 1988 च्या कायद्यातील रकमेपेक्षा दहापट जास्त आहे.

नेमके काय आहेत नवे नियम?

  • 1 सीटबेल्ट लावला नसल्यास आधीचा दंड 100 रुपये, आताचा दंड 1,000 रुपये
  • 2 हेल्मेट घातलेलं नसल्यास आधीचा दंड 100 रुपये, आताचा दंड 1,000 रुपये, आणि महिन्यांपर्यंत लायसन्सही रद्द
  • 3 आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रुपये किंवा त्याहून दंड किंवा 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा या दोन्हीही शिक्षा
  • 4 लायसन्स नसल्यास 5 हजार किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 5 दुसऱ्यांदा लायसन्स न आढळल्यास 10 हजार किंवा त्याहून अधिक दंड किंवा 1 वर्षाची शिक्षा किंवा दोन्ही
  • 6 लायसन्स रद्द झालेलं असतानाही वाहन चालवल्या 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 7 वेग मर्यादा न पाळल्यास 5 हजार किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 8 अल्पवयीन व्यक्तीने गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवले जाईल आणि 25 हजार रुपये दंडासोबत 3 वर्षांचा तुरुंगवास
  • 9 शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द होऊन अल्पवयीन आरोपी 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला लायसन्स दिलं जाणार नाही
  • 10 मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा.
  • 11 मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 12 सिग्नल तोडल्यास 5 ते 10 हजार रुपये दंड किंवा 6 ते 12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 13 हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 14 मोठमोठ्याने हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा 1 हजार रुपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास 2 हजार रुपयांचा दंड
  • 15 वाहनाला विमा संरक्षण नसल्यास 2 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 16 1मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 4 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 17 वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास 1 हजार ते 5 हजार रुपये दंड किंवा 6 ते 12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
  • 18 हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!