गोव्यासाठी अजून एक ‘जोडपं’ बजावणार सेवा

साहिल नारुलकर | प्रतिनिधी
गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पर्यटन स्थळे. देशविदेशातील अनेक पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येतात. गोवा हे शांतीप्रिय आणि निसर्गरम्य राज्य असल्यानं अनेक प्रेमी युगुल प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी गोवा पसंत करतात. अनेक नवविवाहित जोडपी आपला हनिमून साजरा करण्यासाठी गोवा गाठतात. आता तुम्ही म्हणाल आम्ही हे सगळं तुम्हाला का सांगतोय? थांबा त्याला कारणही तसंच आहे.

नागरी सेवा म्हटलं आंतराज्यीय बदल्या आल्या. आणि त्यात जर तुम्ही विवाहीत असाल तर कुटुंबासोबत तुमची या राज्यातून त्या राज्यात वारी ठरलेली. आणि जर पती-पत्नी दोघंही नागरी सेवेत असतील तर? होय अशी अनेक जोडपी आहेत जी नागरी सेवा बजावतायत. वैवाहिक आयुष्यातील अनेक वर्ष त्यांना दुरावा सहन करत त्यांना सेवा बजावावी लागते. अशा जोडप्यांना एकाच राज्यात नियुक्ती मिळणं त्यापेक्षा दुसरं सुख नसावं दुसरं. बुधवारी गोव्यातील ३ आयएएस आणि २ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या आयएएस मागू हागे यांना अरूणाचल प्रदेशात, आयएएस मायकल डिसोझा यांना लडाख, तर ज्योती कुमारी यांची अंदमान येथे बदली करण्यात आलीए. तर आयपीएस शिवेंदू भूषण यांना मिझोरम आणि शेखर प्रभूदेसाई यांना अरूणाचलला पाठवण्यात आलंय. आता त्यांच्या जागी गोव्यात कुणाची नेमणूक झालीए हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. गोव्यात आयएएस संजय गोयल आणि अंकिता मिश्रा यांची नियुक्ती झालीए. तर आयपीएस अक्षत कौशल यांची नियुक्ती झालीए. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयएएस अंकिता मिश्रा आणि आयपीएस अक्षत कौशल हे नवरा-बायको आहेत.

आयएएस आणि आयपीएस असलेल्या दापत्यांनी नियुक्ती एकाच ठिकाणी होणं हे गोव्याला काही नवं नाही. गोव्याच्या इतिसाहात अनेक आयएएस आणि आयपीएस दापत्यांची नेमणूक एकाचवेळी गोव्यात झालेली दिसून येतेय. आयएएस अमेय अभ्यंकर आणि निला मोहनन, सचिन आणि शिल्पा शिंदे आणि आयपीएस कार्तिक आणि प्रियांका कश्यप अशा अनेक दापत्यांनी गोव्यातील प्रशासन व्यवस्थेत सेवा बजावल्याचं आपण पाहिलंय. आयएएस अमेय अभ्यंकर आणि निला मोहनन या जोडप्याची जुलै 2014 नियुक्ती झाली होती. अमेय हे पर्यटन संचालक म्हणून तर निला मोहनन या उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. या जोडप्याने अगदी निष्ठापूर्वक काम केलेलं दिसून आलं. दुसरं जोडपं म्हणजे आयएएस सचिन आणि शिल्पा शिंदे. आयएएस सचिन हे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तर शिल्पा या राज्यपाल सचिव म्हणून काम पाहत होत्या. तीसरं आणि सगळ्यात प्रसिद्ध जोडपं म्हणजे आयपीएस कार्तिक आणि प्रियंका कश्यप. यांनीही निष्ठेने पोलिस सेवेत काम केलं. या महत्त्वाच्या तीन जोडप्यांनंतर आता चौथं जोडपं गोव्यात दाखल होतंय ते म्हणजे आयएएस अंकित मिश्रा आणि आयपीएस अक्षत कौशल. नागरी सेवेची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते ट्रेनिंग घेत असताना त्यांचं जुळलं आणि पुढे ते विवाहबंधनात अडकले.
