…आधी नेटवर्क द्या, मगच ऑनलाईन शिक्षण सुरू करा !

'मगो'च्या ढवळीकरांनी गोवा सरकारला फटकारले !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : खराब नेटवर्कच्या मुद्द्यांबाबत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पक्षातर्फे निवेदन देणार आहोत. त्यामुळं पायाभूत नेटवर्क सुविधा सुरू होईपर्यंत संपूर्ण गोव्यात ऑनलाईन शिक्षण थांबवावे, अशी मागणी ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षा’चे (मगोप) प्रमुख सुदिन ढवळीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

ढवळीकर यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले, मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे, की नेटवर्कची पायाभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत संपूर्ण गोव्यात ऑनलाईन शिक्षण बंद करावे. विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्येचा सामना करावा लागत आहे. 27 जुलैपूर्वी हा प्रश्न निकाली न निघाल्यास आगामी विधानसभा अधिवेशनात त्याकडे लक्ष देण्यास सरकारला भाग पाडले जाईल.

आज मी राज्य सरकारला अशी मागणी करत आहे, की ज्यांना परवडत नाही अशा समाजातील सर्व घटकांना स्मार्टफोन द्यावेत. काही पालकांनी आपली नोकरी गमावली असून त्यासाठी पैसे खर्च करणे अवघड आहे, असेही ते पुढे म्हणाले.

ढवळीकर यांनी योग्य पायाभूत सुविधा नसताना ऑनलाईन शिक्षण सुरू केल्याबद्दल सरकारला फटकारले आहे. ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याचे मुख्यमंत्र्यांना ठाऊक आहे आणि हेही ठाऊक आहे की सर्व गावांमध्ये मोबाइल टॉवर नाहीत. नेटवर्कच्या समस्येविषयी माहिती असूनही काही शाळांनी ऑनलाईन वर्ग कसे सुरू केले, असा सवालही त्यांनी सरकारला केला.

ते म्हणाले, जेव्हा मी शिक्षण संचालकांना यासंदर्भात विचारले, तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मला उत्तर देतील असे त्यांनी सांगितले. परंतु आतापर्यंत त्यांच्याकडून मला काहीच उत्तर मिळालं नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!