भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, प्रफुल्ल पटेलांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंगची शक्यता असल्याचे सूतोवाच

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : राज्याच्या निवडणुकींना आता फक्त 14 महिने बाकी राहिले आहेत. अशात राज्यातील घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वपूर्ण विधानं केली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंगची शक्यता असल्याचे सूतोवाचही दिलेत.

गोव्यातील लोकांना भाजप नकोय?

गोव्यातील लोकांना भाजपा नको असल्याने पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोक पाहू लागलेत, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरु केल्याचं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

भाजपाला विरोध करण्यासाठी आमच्या सोबत समविचारी आणि मित्र पक्ष येणार आहेत. काँग्रेस, भाजपा या दोन मोठ्या पक्षांचे तसेच इतर लहान पक्षांचे नेते यांच्यासह काही अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्या नेत्यांची आणि अपक्ष आमदारांची नावे आम्ही योग्यवेळी जाहीर करू.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी वापरलेल्या शेलक्या शब्दाबद्दल ते म्हणाले की, नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते काहीही आरोप करतात.

टिळक मैदान संकुलातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वास्को गट समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसौझा, आमदार चर्चिल आलेमांव, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नझीर खान उपस्थित होते. उद्घाटनानंतर पटेल पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राप्रमाणे गोव्याचा फॉर्म्युला?

महाराष्ट्रामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारामुळे महाआघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्याच धर्तीवर गोव्यात आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. परंतु काँग्रेसने ऐनवेळी निवडणुक पूर्व आघाडी करण्यास नकार दिला. आम्ही एकत्र आलो असतो तर नक्कीच सरकार स्थापन झाले आहे. निवडणुक निकालानंतर काँग्रेसचे 17 आमदार, गोवा फॉरवर्डचे तीन आणि आमचा एक असे एकवीस आमदारांसह सरकार स्थापन शकले असते. पण काँग्रेसच्या नकरात्मक भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही.

गोव्यात काँग्रेसने भाजपाला सरकार स्थापन करण्यास हातभार लावला हा आमचा स्पष्ट आरोप असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी फक्त पाच आमदार राहिले आहेत. तथापी युती करण्याऐवजी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुक लढवून भाजपाला हरवू पाहण्याची स्वप्ने पाहत आहे. ते तेवढे सोपे नाही.भाजपाला हरविण्यासाठी काँग्रेसला आमच्यासोबत यावयाचे नसेल तर काय सांगणार असे पटेल म्हणाले. पालिका निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावरील परिस्थिती पाहून स्थानिक पदाधिकारी योग्य निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!