अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मुंबई एनसीबी टीमच्या हाती

रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे छापेमारी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने अमली पदार्थ तस्करी प्रकरणी रविवारी सायंकाळी आणि सोमवारी पहाटे आसगाव – बार्देश येथील दोन बंगल्यावर छापा मारून उगोचुक्वू सोलोमन उबाबुको (नायजेरियन नागरिक) व जॉन इन्फिनिटी ऊर्फ डॅव्हिड (काँगो येथील नागरिक) या विदेशी नागरिकांना अटक केली आहे. तर गोमंतकीय संशयित प्रसाद वाळके फरार आहे. यातील उगोचपक्वू सोलोमन उबाबुको याच्या विरोधात दोन अमली पदार्थ, तर एक भादंसंचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एका अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात संशयिताला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. तर फरार संशयित प्रसाद वाळके याच्या विरोधात पूर्वी एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने संशयित उगोचुक्वू सोलोमन उबाबुको या संशयिताला २८ ऑक्टोबर २०१३ रोजी मध्यरात्री पणजी येथील हॉटेल फिदाल्गोच्या चिली एण्ड स्पाईस या रेस्टॉरंटमधून ताब्यात घेतले होते. त्यावेळी संशयितांकडे ४५१ ग्रॅम कोकेन सापडल्याचे म्हटले होते. त्यानुसार एनसीबीने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे १९८५ कलम ८ (सी) आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करून रीतसर अटक केली होती. त्यावेळी एनसीबीने शिवोली येथील एका कारची झडती घेत १२.५ ग्रॅम एमडीएमए जप्त केले होते. या प्रकरणी आणखी एका संशयितालाही अटक केली होती. त्यानंतर एनसीबीने संशयितांविरोधात २१ फेब्रुवारी २०१४ रोजी म्हापसा येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने २३ जून २०१५ रोजी दोन्ही संशयितांच्या आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने दोन्ही संशयितांना पुराव्याअभावी १ एप्रिल २०१६ रोजी निर्दोष मुक्त केले होते. त्यावेळी त्यांची सुटका करताना १० हजार रुपयांची हमी घेतली होती.

तर दुसरा गुन्हा कळंगुट पोलिसांनी २०१२ मध्ये दाखल केला आहे. यात संशयिताकडून पोलिसांनी ३.६६९१ ग्रॅम कोकेन आणि ०.८८२५ ग्रॅम एॅक्टेसी टॅब्लेट्स जप्त केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात पदार्थ विरोधी कायद्याचे १९८५ कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी संशयितांवर २८ जुलै २०१६ रोजी आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात संशयित जामिनावर सुटल्यानंतर फरार झाल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १८ मार्च रोजी होणार आहे. तर तिसरा गुन्हा हणजुणे पोलिसांनी २०१८ मध्ये संशयिताविरोधात बेफिकीर वाहन चालवून अपघात प्रकरणी दाखल केला आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात भादंसंच्या कलम २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १९६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी म्हापसा येथील जलद न्यायालयात होणार आहे.

दरम्यान, अमली पदार्थ तस्करी प्रकरणी संशयित प्रसाद वाळके याच्या विरोधात ११ जानेवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संशयिताविरोधात पदार्थ विरोधी कायद्याचे १९८५ कलम ८ सी, २० (बी) (ii) (ए), २१ (बी) आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला रीतसर अटक केली होती. त्यानंतर संशयिताला ५० हजार रुपयाच्या हमीवर व इतर अटीवर १४ मे २०१८ रोजी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.

फरार प्रसाद वाळकेच्या बंगल्यावर छापा

एनसीबीने सोमवारी (दि.८) पहाटे आसगाव येथील प्रसाद वाळके याच्या बंगल्यावर छापा मारून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केला आहे. वाळके सध्या फरार असून त्याच्या विरोधात ११ जानेवारी २०१८ रोजी एनसीबीने अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याच्याकडून ०.५३ ग्रॅम एलएसडी, ८.०९ ग्रॅम कोकेन, ०.७५ ग्रॅम एॅक्टेसी टॅबल्टेस आणि ४२८ ग्रॅम गांजा जप्त केला होता.

सुशांत सिंहला ड्रग्जपुरवणाराही अटकेत

DRUGS GOA 800 X 450
DRUGS GOA 800 X 450

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण आणि ड्रग्स व्यवसायाची पाळेमुळे खणण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने रविवारी मिरामार येथे छापा टाकून हेमंत शहा उर्फ महाराज शहा याला पकडण्यात यश मिळविले. यावेळी त्याच्याकडून पथकाने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केला आहे. मंगळवारी त्याला रिमांडासाठी पणजी प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, एनसीबीने आसगाव-बार्देश येथे दोन ठिकाणी छापा टाकून दोन विदेशी नागरिकांना अटक केले आहे. त्यांनी रात्री उशिरा म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.


मुंबई एनसीबीने सुशांतसिंग मृत्यूप्रकरणी आणि ड्रग्स व्यवसाय प्रकरणी सिंग याची मैत्रीण रिया चक्रवर्ती याचा भाऊ शोविक चक्रवर्ती व इतर संशयितांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम ८(सी),२०(बी)ए, २७ (ए) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अनुज केशवानी याला अमली पदार्थ पुरविण्यास संशयित हेमंत शहाचा सहभाग असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीने रविवारी मिरामार येथून संशयित शहा याला ताब्यात घेतले. या कारवाईत त्याचाकडून एलएसडीचे १५ ब्लॉट आणि ३० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले आहे. संशयित शहा मूळचा मध्यप्रदेश येथील असून तो गेली अनेक वर्षे मोरजी येथे बुएना वीडा नावाचा शॅक चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पाहा – Special Report | नार्कोटिक्सची मुंबईतील टीम गोव्यात एक्शन मोडमध्ये

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!