एनसीबीची गोवा, मुंबईत मोठी कारवाई

नायजेरियन नागरिकाला कळंगुट येथे अटक; मुंबईत दोन ठिकाणी केले अमली पदार्थ जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) मुंबईने अमली पदार्थांचा नेटवर्क तोडण्यासाठी तसंच गोवा आणि मुंबई शहरातील एमडी तस्करांना/पेडलर्सना तडीपार करण्यासाठी सखोल कारवाई केली आहे. एनसीबी मुंबई आणि गोव्याच्या पथकांनी 6 सप्टेंबर रोजी एका दिवसात 04 ऑपरेशन्स राबवले आणि 03 ठिकाणी कारवाई करत गुन्हे दाखल केलेत. या ऑपरेशन्सदरम्यान एकूण 34.5 किलो कोडीन सिरप, एलएसडीचे व्यावसायिक प्रमाण, 105 ग्रॅम हेरॉइन, 400 ग्रॅम (700 गोळ्या) निट्राजेपाम, काही प्रमाणात कोकेन आणि हायड्रोपोनिक मल्टी स्ट्रेन वीड असे जप्त केले आहे. तसंच एका नायजेरियन नागरिकासह 04 जणांना अटक केलीये, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलीये.

हेही वाचाः गणेश चतुर्थीसाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्वे ‌जारी

कळंगुट येथे नायजेरियन नागरिकाला अटक

एनसीबीने राबवलेल्या गोव्यातील मोहिमेत डेव्हिड नावाच्या एक नायजेरियन नागरिकाला अटक केलीये. हा नायजेरियन पर्रा आणि हडफडे भाग तसंच आसपासच्या परिसरात एलएसडी, कोक, एक्स्टसी इत्यादी ड्रग्स पुरवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर एनसीबीने गेल्या दोन दिवसांपासून डेव्हिडवर पाळत ठेवली होती. प्रयत्नांचा परिणाम म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सब झोन गोवा यांनी रात्री 10 च्या सुमारास नागवा ग्रँड हॉटेल, कळंगुट- म्हापसा रोड, हडफडे येथून संशयिताला पकडण्यात यश मिळवलं. यावेळी त्याच्याकडून एलएसडी (व्यावसायिक प्रमाण) आणि कोकेन जप्त करण्यात आली.

संशयित नायजेरियन नागरिकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पुढील पोलिस तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

संशयित मोहमीद, अजय यांना अटक

मुंबईत एके ठिकाणी राबवलेल्या मोहिमेदरम्यान एनसीबी मुंबईने मुंबई येथील भायखळा (पश्चिम) येथील मोहमीद नासीर साईफर रेहमान खान याच्या घरावर छापा टाकला आणि 27 किलो कोडीन सिरप जप्त केले. तसंच या मोहिमेत मोहमीद नासीर साईफुर रेहमान खान आणि एमडी सलमान शेख यांना 6 सप्टेंबर रोजी अटक केली.

मोहमीद नासिर साईफुर रेहमान खानने माहिती दिल्यानंतर एनसीबी मुंबईने नरियालवाडी, माजगाव, मुंबई येथील अजय नागराजच्या घरावर छापा टाकला आणि 7.5 किलो कोडीन सिरप, 105 ग्रॅम हेरॉइन, 400 ग्रॅम (700 गोळ्या) निट्राजेपाम आणि 250 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई 6 सप्टेंबर रोजी करण्यात आली, ज्यावेळी संशयित अजय नागराजला अटक करण्यात आली.

एनसीबीने मोहमीद, अजय या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेत अमेय शेटगांवकर पेडणे तालुक्यात प्रथम

60 ग्रॅम मल्टी स्ट्रेन बड्स कॅनबिस जप्त

खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर एनसीबी मुंबईच्या पथकाने मुंबई येथील बॅलार्ड इस्टेट येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे मोहीम राबवली आणि चॉकलेटबॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या 60 ग्रॅम मल्टी स्ट्रेन बड्स कॅनबिस जप्त केल्या. 6 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. हे पार्सल कॅनडामधून मुंबईत आले होते. या मोहिमेत जप्त केलेल्या मल्टी स्ट्रेन बड्सची किंमत अवैध बाजारात प्रति ग्रॅम 5,000/- ते 8,000 रुपये आहे.

या प्रकरणी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल केला आहे. तसंच पार्सल घेणाऱ्याला पकडण्यासाठी फॉलो ऑपरेशन सुरू केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः POLITICS| LOBO- पुन्हा एकदा मायकल लोबो राजकीय कृतीमुळे चर्चेत
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!