कुंडईतील नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव…

जत्रोत्सवास १ डिसेंबर रोजी सुरूवात होत असून ६ डिसेंबर रोजी रथोत्सवाने सांगता होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : देवभूमी गोमंतकात जी अनेक श्रध्दास्थाने आणि अति प्राचीन हिंदु देवालये आहेत त्यापैकीच एक फोंडा तालुक्यात कुंडई गावात श्री नवदुर्गा देवीचे फार प्राचीन, सुप्रसिध्द आणि जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाच्या सभोवार आसमंतात जिकडे तिकडे सृष्टी देवीने पसरलेला तो नेत्रदीपक आणि आनंददायक हिरवागार शेतीचा गालिचा, वनपुष्पांचा सुवास, गोड पाण्याचे झरे आणि तलाव मनोरम सृष्टी सौंदर्य असा रम्य देखावा पाहिल्यानंतर स्वर्गीय देवतानाही हेवा वाटावा आणि या भूमीत आपले वास्तव असावे, असे वाटल्यास नवल ते कोणते..!

माणसाला जीवनाच्या इतिकर्तव्याची प्रेरणा एखाद्या धार्मिक स्थळापासून मिळू शकते. जसा श्रद्धा, भक्ती व त्यातून मिळणारा परमानंद यांचा संगम मानवी जीवनात घडतो हे खरे, पण मानव हाच मुळी निसर्गाचे एक अपत्य. निसर्गाचा एक वेगळाच संगम या पावन भूमीत अवतरला आहे. जगत निर्माता श्री ब्रह्मा, पालन करणारा श्री विष्णु व अंतिम गती देणारा श्री महेश हा जसा एक हिंदु धर्मशास्त्रातला अनोखा संगम तसाच श्री महादेव तलाव, श्री नवदुर्गा तलाव व श्री वेताळदेव तलाव असा एक तीन तलावांचा संगम या स्थानावर पहायला मिळतो.

जन्मदात्या निसर्गाचा हा एक अनोखा संगम. असे सांगतात की स्व . वामनराव शिवराम कुंडईकर हे रोज सायंकाळी तलावात स्नान करून, त्रिकाल संध्येतील सायंकालीन संध्या करून २-२ तास ध्यानस्थ बसत व परमानंदाचा आस्वाद घेत. स्व. सौ. सीताबाई कुंडईकरांना अंदाजे १९३० मध्ये याठिकाणी जीवनाच्या इतिकर्तव्यतेची प्रेरणा मिळाली . १९४४ साली निधन होण्यापूर्वी त्यांनी ही जागा दान अर्थात देवीला अर्पण करण्याची इच्छा प्रकट केली. सर्व हे तिचेच आहे या विशुद्ध भावनेने. त्यानंतर देवस्थान समितीकडे ही जागा सुपूर्द करण्यात आली. दरवर्षी श्री नवदुर्गेचा जत्रोत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली व आपल्या पूर्वजांनी दिलेले हे भक्तीचे संचित आजही परंपरेने कुंडईकर पुढे चालवत आहेत. जत्रोत्सवाची सुरवात देवीला साकडे घालून होते व जत्रोत्सव संपेपर्यंत अनेक कार्याचा मान कुंडईतील शेणवी कुंडईकर कुटुंबाला जातो. ही एक परंपरा ग्रामस्थांनी मोठया भक्तीने पाळली आहे.

या देवालयाचा जीर्णोद्धार कुंडई ग्रामसंस्थेकडून १९१० साली झाला. कुंडईत श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून तिलाच ग्रामदैवत मानू लागले आणि यामूळे येथील मूळची दैवते तिची आनुषंगिक दैवते मानण्यात आली. हे दैवत प्रमुख असून तिच्या अनुषंगिक दैवतात श्री महादेव (लिंग), श्रीगणपती श्रीक्षेत्र गोकर्ण येथील लंबोदर मुर्ती सारखी, श्री आदिनारायण, श्रीग्रामपुरुष, श्रीवेताळ आणि या वेताळ देवालयाच्या सभोवार बावका देवता राटारौद्री आणि कानडया पुरुष, श्रीमल्लिकार्जुन , श्रीनारायण मूर्ती आहे. कानडया पुरूष नावाच्या दैवताचा उल्लेख केलेला आहे, ते दैवत सुमारे तीन हात उंच स्तंभाकृती असून , त्याच्या मध्यभागी स्त्री पुरुषयुग्म आहे.

श्रीनवदुर्गा देवीच्या महाजनांना वांगड हा शब्द वापरला जातो . तिची मूळची पाच कुळे आहेत ती अशी १.आक्सणकर २.मावजेकर ३.गरदरकर ४.आमोळकर ५. सीसाणी कुंडईकर. येथील लोकांचा शेती व्यवसाय होता व गावात देवीची स्थापना झाल्यावर त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने देवीच्या शेजारीच शेतीला बांध घालून, मोठा तलाव निर्माण केला व या बांधाने कुंडई ते मडकई गाव जोडला गेला.

या देवीच्या उत्सवाचा दिवस दर महिन्यातील शुक्ल वद्य नवमी असून रात्री पालखी उत्सव होतो. या दिवशी महाजन व भक्त उपवास करतात. रात्री नवमीची पालखी मिरवणूक काढताना देवीला प्राकारांत उजव्या बाजुने असलेल्या संगमरवरी पाषाणाच्या आसनावर ठेवून पेणे केले जाते व भक्त गणांकडून भजन केले जाते.

या देवस्थानचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल नवमीपासून चतुर्दशीपर्यंत होत असतो. ही जत्रा पूर्वी कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षात होत असे आणि या वद्य पक्षाच्या त्रयोदशीच्या पहाटेस निर्दिष्ट रहाट फिरविण्याचा प्रकार करीत असत.
एकेकाळी कुंडई गावात एक विलक्षण प्रकारची भयंकर चाल “देवबाब” या नावाखाली चालू होती. सुमारे साडेसात हात उंच असा एक मोठा लाकडी धारण जमिनीत पुरुन, त्याच्यावर एक चक्राकर रहाट बसवित असत. त्यास चौघे भले मोठे दांडगे तरुण, ज्यांच्या कमरेच्या चामडीत लोखंडी गरे प्रत्येकी दोन याप्रमाणे अडकवून त्या चौघांही इसमांस निर्दिष्ट रहाटास उपडी लांबवित. नंतर रहाट वेगाने फिरवून ठराविक फेरे होताच त्यांना खाली उतरवून त्यांच्या जखमांवर श्रींच्या तीर्थ गंधादिकाचा लेप करीत असत. एका वर्षी रहाट फिरवित असताना या चार इसमांपैकी एकाची चामडी तुटून तो दूर भिरकावून पडला व त्याचा तेथेच मोक्ष झाला. पुढे तो समंध झाल्यामुळे त्याची स्थापना श्री वेताळ देवालयाच्या दक्षिण बाजूस निर्दिष्ट पाषाण खंडरुपाने केल्याचे सांगतात. या भयंकर अनुभवामुळे ही चाल तेव्हा पासून कायमची बंद केल्याचे सांगतात.
चतुर्दशी हा महापर्वणचा दिवस मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल नवमीला सकाळी निर्माल्य विसर्जन होते आणि वस्त्र व सुवर्ण अलंकाराने देवीला श्रृंगारून महापूजा केली जाते. या दिवशी देवीचा उपवास असल्याने महाआरती , महानैवेद्य, संध्याकाळी व पहाटे पालखी उत्सव होतो. नंतर देवी नवदुर्गा श्रीनारायण देव मंदिराकडे जाते व तेथील तलावावर जाऊन दिवसभर बसते. तिथे श्रीबेताळ देवाचा रथ सजविलेला असतो. बेताळ देवाचा रथ व देवीची पालखी कामत कुंडईकरांच्या अंगणात आणली जाते. नंतर पेणे करून भक्तांची काणूक व भेटवस्तू स्वीकारून देवी नवदुर्गेचा गजर घालून पालखी व रथ मिरवणुकीने गावात आणला जातो.

मार्गशीर्ष एकादशीच्या रात्री नौकाविहार साजरा होतो. मार्गशीर्ष द्वादशी रात्री लालखी उत्सव होतो. मार्गशीर्ष त्रयोदशी रात्री देवीच्या वस्त्रांचा व फळफळांचा लिलाव होतो नंतर नाटक सादर केले जाते. पहाटे पालखीतून देवीला महादेव मंदिराकडे नेऊन सजविलेल्या रथाकडे आणतात. तिथे पूजा, आरती झाल्यावर देवीच्या नावाचा गजर घालीत रथोत्सव साजरा केला जातो. तद्नंतर , देवीच्या प्रकारांत बहुजन समाजाच्या भक्तांच्या स्त्रियांचा “दिवजा” (दिवजोत्सव) हा कार्यक्रम गडयामोय देवाच्या चरणी पेटवून साजरा केला जातो.

संध्याकाळी कुलकर्णी देवीला आरती दाखवून , गाऱ्हाणे घालून रथ नाचवित प्राकारांत आणून, पेणे करून मंदिराचे फेरे घेऊन रथोत्सवाची समाप्ती होते. रात्री देवीच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात येतो व जत्रोत्सवाची समाप्ती होते.

लेखक – शांतो गणेश नाईक (धारजो, कुंडई)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!