गोवा विद्यापीठात विज्ञान साहित्यावर राष्ट्रीय ई-परिसंवाद

डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते ई-परिसंवादाचं उद्घाटन आणि बीजभाषण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘मराठीतील विज्ञान-साहित्य: परंपरा आणि आव्हाने’ या विषयावरील राष्ट्रीय ई-परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय.

हेही वाचाः मराठी साहित्य-कला क्षेत्रात वावरणाऱ्या नवयुवकांसाठी ‘युवाविष्कार’

डॉ. पंडित विद्यासागर परिसंवादाचे उद्घाटक

सोमवार १ मार्च सकाळी १०.३० वा. हा परिसंवाद होणारेय. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. पंडित विद्यासागर ई-परिसंवादाचे उद्घाटन आणि बीजभाषण करणारेत.

विविध सत्रात नामवंत साहित्यिकांकडून मार्गदर्शन

पहिल्या सत्रात ‘मराठी विज्ञान साहित्याची परंपरा, बदलते आयाम आणि इंग्रजी साहित्याचा त्यावरील प्रभाव’ या विषयावर नामवंत विज्ञान-साहित्यिक श्री. निरंजन घाटे यांचं व्याख्यान होणारेय. दुसर्‍या सत्रात ‘मराठी विज्ञानकथा – स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावर प्रा. माधुरी शानबाग बोलणारेत. तिसर्‍या आणि समारोपाच्या सत्रात ‘मराठी विज्ञानकथाकारांपुढील आव्हाने’ या विषयावर प्रख्यात मराठी विज्ञानकथाकार श्री. सुबोध जावडेकर भाष्य करणारेत.

गुगल मीटवर परिसंवाद

विज्ञान-साहित्य हा मराठी साहित्यातील महत्त्वाचा साहित्यप्रवाह आहे. अलिकडेच नामवंत वैज्ञानिक आणि विज्ञान-साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालीये. या निमित्ताने या साहित्यप्रवाहाकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. प्रस्तुत राष्ट्रीय ई-परिसंवादाच्या निमित्ताने मराठीतील विज्ञान-साहित्याच्या वेगवेगळ्या आयामांचा वेध घेतला जाणारेय. प्रस्तुत ई-परिसंवाद गुगल मीटवर आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मराठी विभागाच्या यूट्यूब चॅनलवरदेखील याचं प्रक्षेपण केलं जाणारेय.

सर्व विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक आणि जाणकारांना या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचं आवाहन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनीता उम्रस्कर तसंच विभागातील सहायक प्राध्यापक आणि ई-परिसंवाद संयोजक प्रा. चिन्मय मधू घैसास यांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!