नारी शक्ती हे देवीचं रूपः सुखप्रीत कौर

पुन्हा राज्यात भाजपाचंच सरकार म्हणत दाखवला विश्वास

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः देशाची नारी शक्ती ही देवीचं रूप आहे. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण या पुढे गावागावात फिरून तिथली संस्कृती आणि संस्कार यांचा अभ्यास करणार आहे. नारी शक्तीच्या हातात आपला देश सुरक्षित आहे. आगामी काळातही राज्यात आणि देशात भाजपचंच सरकार सत्येत येणार, असं प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या केंद्रीय नेत्या तथा सरचिटणीस सुखप्रीत कौर यांनी केलं. मांद्रे येथील भाजप महिला मोर्चा सभेत त्या बोलत होत्या.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने महिला सभेचं आयोजन

मांद्रे भाजप महिला मोर्चा यांनी मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने महिला सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब, महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर, राज्य उपाध्यक्ष एकता चोडणकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष नयनी शेटगावकर, दीपश्री सोपटे, आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, माजी सरपंच संगीता नाईक, केरी सरपंच सुरज तळकर, महिला सरचिटणीस शीतल नाईक, सपना मापारी, महिला नेत्या सावित्री कवळेकर आदी उपस्थित होते.

येणारं सरकार हे महिलांना समर्पित असणारं सरकार

एक कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान बनतो ही ताकद भाजपची आहे. देशात अकरा महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्याशिवाय महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या माजी उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. येणारं सरकार हे महिलांना समर्पित असणारं आहे. महिलांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, असं कौर म्हणाल्या.

१७ राज्यात भाजपाचे सरकार

१७ राज्यात भाजपचं सरकार आहे. भाजप सरकारमुळे महिला नेतृत्व पुढे येत आहे आणि ही किमया केवळ भाजप पक्षातच घडू शकते. स्वदेशी कपड्यांना प्राधान्य देण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या दिनी अधिकाधिक महिलांनी हातमागच्या साड्या परिधान केल्या आहेत. त्या पारंपरिक व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. स्वदेशी कपड्यांसाठी आता आम्हाला जागृत रहायला हवं, असं कौर यांनी सांगितलं.

संघटनात्मक कामामुळे भाजप मजबूत

आमदार दयानंद सोपटेंनी पूर्ण भाषण हिंदीत केलं. संघटनात्मक कामामुळे भाजप मजबूत असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो. मी एकदा जिल्हा पंचायत सदस्य आणि तीन वेळा आमदार झालो. आपण गरीब आहे, पण महिलांना किंवा मतदारांना पैसे देऊन सभांना गर्दी करत नाही. जी महिला शक्ती आहे त्यांना सरकारच्या विविध योजना मिळवून देतो. त्यामुळे महिला एकत्रित येतात. मी गरीब असलो तरीही माझं मन श्रीमंत आहे. मी माझ्या वाणीतून लोकांना आकर्षित करतो, असं सोपटे म्हणाले.

हेही वाचाः DELTA VARIANT | डेल्टा व्हेरियंटचे आणखी 64 रुग्ण समोर

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रुती केरकर यांनी केलं, तर समीक्षा शिरोडकर, नयनी शेटगावकर, संगीता लिंगुडकर, वंदना आजगावकर, रजनी शिरोडकर, प्राची मांद्रेकर, अनिशा केरकर आदींनी पाहुण्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. नयनी शेटगावकर यांनी प्रास्ताविक केलं.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!