देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी लढलेल्या सर्वांना अभिवादन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ट्विट करत व्यक्त केला आदर; आणीबाणीला झाली 46 वर्षं पूर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. 1975 मध्ये या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती, ज्याने अनेक ऐतिहासिक घटनांना जन्म दिला. इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं. 26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती. जनतेने प्राणपणाने आणीबाणीविरोधात स्वातंत्र्याचा दुसरा लढा पुकारला. लेखक, कवी, पत्रकार, कलावंत आणि बुद्धिवादी या लढ्यात उतरले. त्या सर्वांना मी अभिवादन करतो, अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी केलंय.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं ट्विट

ट्विट करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना लिहिलंय, 1975 मध्ये या दिवशी इंदिरा गांधी यांनी काँग्रेस सरकारचं नेतृत्व करून स्वत:चे राजकीय हितसंबंध पूर्ण केले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आणीबाणी लादून भारताला हुकूमशाहीच्या अंधाऱ्या कोठडीत ढकललं. तेव्हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी लढलेल्या सर्वांना मी अभिवादन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करताना लिहिलंय.

आणीबाणीला 46 वर्षं पूर्ण

देशात 26 जून 1975 पासून 21 जून 1977 या आणीबाणीच्या काळात विरोध करण्यासाठी देशातून संघर्ष करणाऱ्यांमध्ये गोव्यातील 58 जणांनी भाग घेतला. या 58 जणांमध्ये राज्यातील पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, तसंच तत्कालीन जनसंघ (सध्याचं भाजप) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अन्यायकारक आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या घटनेला यंदा 46 वर्षं पूर्ण होतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!