मुरगाव पालिका क्षेत्रात साचले कचर्‍याचे ढीग

वेतनाच्या प्रश्नावरून कामगारांचा असहकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : मुरगाव पालिकेचे कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार, वाहन चालक व इतर कामगारांचे जानेवारीचे वेतन वितरित करण्यासंबंधी गुरुवारीही कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचारी व कामगार कामावर रुजू झाले नाहीत. गेल्या
शनिवारपासून कचर्‍याची उचल झाली नसल्याने संपूर्ण मुरगाव पालिका क्षेत्रामध्ये कचरा संकलन केंद्र व रस्त्याकडेला कचर्‍याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारीही कामबंद

मुरगाव पालिकेचे कार्यालयीन कर्मचारी व कामगारांनी आपल्या वेतन व विविध मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन केले आहे. मात्र त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी मुख्याधिकारी व प्रशासकच जागेवर नाही. त्यामुळे कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर सदर प्रश्न नेण्याचे जाहीर केले होते. तथापि या प्रकरणी कोणता निर्णय झाला, हे सायंकाळी उशीरापर्यंत कामगारांना कळले नव्हते. त्यामुळे शुक्रवारीही कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे काही कामगारांनी सांगितले. कामगारांच्या समस्यांकडे मंत्र्यांनी लक्ष दिले नसल्याबद्दल कामगारांनी संताप व्यक्त केला.

कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे

दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील कचरा स्वखर्चाने इतर कामगारांमार्फत गोळा करून सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये टाकण्याचे ठरविले होते. तथापी सदर भूमिका कामबंद आंदोलनाला मारक ठरणार असल्याने कामगारांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकले. काही नागरिकांनी रस्त्याकडेला, मायमोळे तळे वगैरे ठिकाणी कचरा टाकल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग नजरेस पडत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!