शिवोलीत आतेसासूंचा खून; भाची सुनेवर आरोप निश्चित

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा: इग्रजवाडा – मार्ना – शिवोली येथे श्रीमती मार्ता क्लेमिंटीना लोबो (64) आणि श्रीमती वेरा लोबो (62) या वृद्ध आते सासूंच्या जाचाला कंटाळून भाडोत्री साथीदाराच्या सहाय्याने भाची सुनेने त्यांचा खून केला होता. या प्रकरणी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालायाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांनी संशयित भाची सून रोविना परेरा लोबो आणि साथीदार सुभान राज्याब अल्ली (हावेरी कर्नाटक) यांच्या विरूद्ध भा.दं.सं.च्या 302 कलमांतर्गत खूनाचा आरोप निश्चित केला आहे.
हेही वाचाः ‘उत्पादन शुल्क’ ची कणकवलीत मोठी कारवाई
15 नोव्हेंबर 2020 ची घटना
ही खूनाची घटना 15 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री घडली होती. संशयित आरोपी रोविना लोबो, त्यांचे पती फिर्यादी ज्यूलिओ लोबो आणि त्यांचे सात आणि चार वर्षांची दोन मुलं मिळून चारही जण मयत दोन्ही अविवाहीत आत्यांच्या सोबत राहात होते. घटनेच्या काही वर्षांपासून संशयित रोविनाचे मयत आत्या सासूंशी पटत नव्हतं. मालमत्ता आणि घरगुती कारणावरून त्यांच्यात वेळोवेळी खटके उडायचे. शिवाय पतीही दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार करायचा. पती आणि आत्यांच्या या जाचाला संशयित कंटाळली होती. या जाचातून सुटका करण्यासाठी तिने आत्या सासू तसंच पतीचाही काटा काढण्याचा बेत आखला. या तिघांचाही खून करण्याची योजना तिने आखली होती. त्यानुसार तिने आसगांव येथे राहणार्या सुभान राज्याब अल्ली या भाडोत्री इसमाची मदत घेतली होती. यासाठी त्यास 30 हजार रूपयांचं आमीष दाखवलं होतं. पती दारू पिण्यासाठी गेल्यावर दोन्ही आत्या सासूंचा खून करणं आणि त्यानंतर पती घरात शिरताच त्याचाही काटा काढण्याचं ठरलं होतं.

मुलांना दिलं झोपेचं औषध
घटनेच्या दिवशी संशयित रोविना लोबो हिने आसगाव येथून दुचाकीवरून संशयित सुभानला आपल्या घरी आणलं आणि त्याला घराच्या मागच्या बाजूने लपवून ठेवलं. रोजच्या प्रमाणे पती ज्यूलिओ हा संध्याकाळी 5.30 वा. घरी आला आणि मुलांना घेऊन शिवोली येथे समुद्रकिनारी फेरफटका मारायला गेला. सांयकाळी 7.30 च्या सुमारास तो घरातून दारू पिण्यासाठी बाहेर पडला.
दोन्ही मयत आत्या सासू त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. तर मुलांनाही झोपेचं औषध संशयित रोविनाने पाजलं आणि त्यांना खोलीत झोपवलं. रात्री 9 च्या सुमारास संशयितांनी घराचा वीज पुरवठा बंद केला आणि दोन्ही आते सासू झोपलेल्या खोलीच्या दरवाजावर दबा धरून बसले.
हेही वाचाः परभव! पण अजूनही कांस्यपदकाची आशा कायम
कोयत्याने केले सपासप वार
खंडीत झालेला वीज पुरवठा बघण्यासाठी मयत मार्ता लोबो ही प्रथम बॅटरी घेऊन खोली बाहेर पडताच संशयित रोविनाने तिच्यावर धारदार कोयत्याचा वार घातला आणि तिला जवळील खूर्चीवर बसवून आणखी सपासप वार केले. तिचा आवाज ऐकून वेरा लोबो ही देखील खोली बाहेर आली असता तिच्यावरही वार केला. कोयत्याचे वार घालून मयतांचं डोकं आणि तोंडाचा चेंदामेदा केला. हा प्रकार दोन्ही मुलांच्या समक्ष घडला.
हेही वाचाः दोन तासाच्या खोळंब्यानंतर चोर्ला घाटाची वाहतूक पूर्वपदावर
अन् मुलीने केला आरडाओरडा
या प्रकाराने भांवावलेल्या संशयिताच्या सात वर्षीय मुलीने आरडाओरडा करीत घराबाहेरील शेजारच्या घरात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. मुलीने आपलं भांडं फोडल्याने पतीचा काटा काढणं शक्य नसल्याचं जाणून चार वर्षीय लहान मुलगा आणि त्या संशयित सुभान अली यास घेऊन रोविनाने स्कुटरवरून पळ काढली. लहान मुलीच्या माहितीच्या आधारे शेजारच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोन्ही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात घरात पडल्या होत्या. शेजारच्या लोकांनी लगेच हणजूण पोलिसांना माहिती दिली. तो पर्यंत फिर्यादी ज्युलिओ लोबो हा देखील घटनास्थळी दाखल झाला होता.
हेही वाचाः अज्ञात वाहनाची धडक, ५ दुचाकी आणि दोन गाड्यांचं नुकसान
संशयितांविरुद्ध आरोप निश्चित
पोलिसांनी घटनेची पंचनामा केला आणि दोन्ही संशयितांना आसगांव येथून मध्यरात्रीच अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्याची सुनावणी सोमवारी न्यायालयात झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही संशयितांविरूद्ध आरोप निश्चित केले.