नोंदणी न करणार्या फळं विक्रेत्यांवर कारवाई

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : म्हापशात पालिकेने वेंडीग झोन समिती कार्यरत करण्याच्या दृष्टीने मार्केटमधील रोजच्या पदविक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणीमध्ये सहभाग न घेणार्या फळे विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कबीर शिरगांवकर यांनी पदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी वेडींग झोन समिती कार्यान्वीत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून म्हापसा पालिका मार्केटमधील रोजच्या विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया पालिकेने हाती घेतली आहे.
यानुसार बहुतेक विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी केली आहे. पण काही विक्रेत्यांनी पालिकेच्या या उपक्रमाला केराची टोपली दाखवून त्याकडे दुर्लक्ष करीत नोंदणी करण्यास असहमती दाखविली होती. त्यामुळे या नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. यात कारवाई केलेल्या फळे विक्रेत्यांचा समावेश होता. मार्केटमध्ये सर्व विक्रेत्यांची नोंदणी होत नाही, तो पर्यंत पालिकेला वेडींग झोन बाबतची पुढील कृती हाती घेण्यास अडचण निर्माण झाली होती.
त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत सहभागी न होणार्या विक्रेत्यांवर कारवाईचा आदेश मुख्याधिकारी शिरगांवकर यांनी पालिका निरीक्षकांना दिला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी सहकार्य न करणार्या फळे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पालिका निरीक्षक विकास कांबळी व शेखर गांवस यांच्या नेतृत्वाखालील पालिका कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
बाजार पेठेतील 38 फळे विक्रेत्यांपैकी 17 विक्रेत्यांनी पालिकेकडे आपली नोंदणी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नोंदणी न केलेल्या या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना बाजारपेठेतून हटविण्यात आले. नोंदणी करे पर्यंत या विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. पालिकेने वेंडीग झोन नियामलीनुसार मार्केटमधील विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेकडे नोंदणी करावी अशी विनंती कर्मचार्यांनी फळे विक्रेत्यांकडे केली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नोंदणी करे पर्यंत त्यांना मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी कबीर शिरगांवकर यांनी दिली.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि बरंच काही