खासदार सार्दिन लोकसभेत मूग गिळून गप्पच!

संसद अधिवेशनात एकही प्रश्न नाही; तेंडुलकरांचे रस्ते, गुरांना प्राधान्य

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : केंद्राच्या विविध प्रकल्पांवरून प्रदेश काँग्रेसने गोव्यात रान पेटवलेलं आहे. पण लोकसभेत गोव्याचं नेतृत्व करीत असलेल्या काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी संसदेच्या हिवाळी आणि नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही एकही तारांकित किंवा अतारांकित प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांचे या प्रकल्पांना अप्रत्यक्षरीत्या समर्थन आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे काही नेते तसंच विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जातोय. सार्दिन यांच्याप्रमाणेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनीही हिवाळी अधिवेशनात शांत राहणंच पसंत केलं. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी रस्ते, मोकाट गुरांना प्राधान्य देत त्यासंदर्भातील दोन प्रश्न विचारले आहेत.

खासदार सार्दिनची चुप्पी

रेल्वे मार्ग दुपदरीकरण, तमनार विद्युत लाईन प्रकल्प तसंच महामार्ग रुंदीकरण या केंद्राच्या तिन्ही प्रकल्पांवरून विरोधी काँग्रेसने राज्यात भाजपला घेरलंय. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तिन्ही प्रकल्पांना विरोध करीत दक्षिण गोव्यात आंदोलनं सुरू केलीत. काँग्रेस आमदारांनी विरोधकांना एकत्र आणून विधानसभेच्या गेल्या तीन अधिवेशनांत याच प्रकल्पांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. स्थगन प्रस्ताव आणून कामकाजावर बहिष्कारही घातला. दक्षिण गोव्यातील विविध स्वयंसेवी संस्थांकडूनही तिन्ही प्रकल्पांना जोरदार विरोध करण्यात येतोय. पण त्यांचा प्रश्न लोकसभेत मांडून त्यांचं समाधान करण्यात मात्र दक्षिण गोव्याचेच खासदार असलेले फ्रान्सिस सार्दिन अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून आलंय. केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच नव्हे, तर त्याआधी १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही खासदार सार्दिन मूग गिळून गप्प बसल्याचेच दिसून येतं. या अधिवेशनाही त्यांनी एकही लेखी प्रश्न उपस्थित केलेला दिसून येत नाही.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सार्दिन, तेंडुलकरांवर निशाणा

दरम्यान, यासंदर्भात प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सार्दिन आणि तेंडुलकर या गोव्याच्या दोन्ही खासदारांवर निशाणा साधला. राज्याचे प्रश्न संसदेत मांडून गोमंतकीयांना दिलासा देण्यासाठी जनता त्यांना संसदेत पाठवत असते. पण सार्दिन आणि तेंडुलकर यांना राज्याचं काहीच पडलेलं नाही. त्यामुळेच सार्दिन यांनी संसदेच्या गेल्या दोन सत्रांत एकही प्रश्न विचारला नाही. अशा नेत्यांमुळेच गोव्यात काँग्रेसची वाताहत झाली होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. गोव्यात असताना सार्दिन स्वत:ला प्रदेश काँग्रेसचे सर्वेसर्वा समजतात. दक्षिण गोव्यातील जनतेसमोर बोलताना प्रकल्पांना तीव्र विरोध करतात. मग लोकसभेत मात्र याविरोधात त्यांनी एक शब्दही का काढला नाही, असा सवाल उपस्थित करत, काँग्रेसच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी याबाबत त्यांना जाब विचारला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

काँग्रेस-भाजपातील साटेलोटे स्पष्ट : आप

केंद्राच्या प्रकल्पांवरून गोमंतकीयांत खदखद व्यक्त होत असताना काँग्रेस खासदार सार्दिन लोकसभेत शांत राहतात यावरूनच काँग्रेस आणि भाजपात साटेलोटे असल्याचं स्पष्ट होतं, अशी टीका आम आदमी पक्षाचे (आप) राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केली. मुरगाव पोर्ट ट्रस्टचा (एमपीटी) विस्तार करण्याच्या योजनेसही केंद्राने नुकतीच मंजुरी दिलीये. त्याचा मोठा फटका गोव्यातील मच्छिमारांना बसणार आहे. तरीही या गंभीर विषयावर दोन्हीपैकी एकाही खासदाराने भाष्य केलेलं नाही. मुळात या खासदारांना गोव्याच्या हिताचं काहीही पडलेलं नाही. स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच ते खासदारकीचा वापर करून घेताहेत, असा आरोपही म्हांबरे यांनी केला.

आम आदमी पक्षाचे (आप) राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!