विनावापर शाळांच्या वास्तू फोंडा तालुक्यात सर्वाधिक

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: शिक्षण खात्याने राज्यातील वापरात नसलेल्या ८४ प्राथमिक शाळांच्या वास्तूंची यादी जाहीर केली आहे. यात फोंडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १५ प्राथमिक शाळांच्या वास्तू विनावापर असल्याचं समोर आलं आहे. याविषयीचं परिपत्रक खात्याने जारी केलं आहे. सरकारच्या योजनेप्रमाणे या वास्तू अन्य सरकारी खाती, अशासकीय संस्था किंवा सामाजिक संस्थांना वापरण्यास मिळणार आहेत.
हेही वाचाः ३०० गरोदर महिलांनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस
गतवर्षी राज्यात विद्यार्थीच नसल्याने अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या. यामुळे त्यांच्या वास्तू विनावापर आहेत. तसंच ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या पुरेशी नव्हती, त्या शाळांचे जवळील सरकारी शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आल्यानं त्यांच्याही वास्तू विनावापर आहेत. त्यांचा वापर करण्याची योजना सरकारने तयार केली आहे.
हेही वाचाः सरकारी योजना आता घरबसल्या एका क्लिकवर
यामुळे सरकारला काहीसा महसूलही प्राप्त होणार
सरकारच्या अनेक खात्यांचा आणि महामंडळांचा कारभार हा भाड्याच्या जागेत चालू आहे. ही कार्यालये विनावापर शाळांच्या इमारतीत स्थलांतरित करणं शक्य आहे. ते शक्य न झाल्यास विनावापर शाळांच्या वास्तू अशासकीय संघटना अथवा सामाजिक संस्थांना भाडेपट्टीवर देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. यामुळे सरकारला काहीसा महसूलही प्राप्त होईल. दरम्यान, सरकारी कार्यालयांच्या स्थलांतरासाठी अर्ज करण्याची गरज नाही.
हेही वाचाः करोनातून बरे झालेल्या ४१ नागरिकांचा मृत्यू
प्राथमिक शाळांच्या सर्वाधिक १५ विनावापर वास्तू फोंडा तालुक्यात
शिक्षण खात्याने जारी केलेल्या यादीत सरकारी प्राथमिक शाळांच्या सर्वाधिक १५ विनावापर वास्तू फोंडा तालुक्यात आहेत. सर्वांत कमी ४ विनावापर वास्तू बार्देश तालुक्यात आहेत. याशिवाय डिचोलीत ११, सत्तरीत १०, केपेत १२, सांगेत ८, काणकोण ६, धारबांदोडा ६ व पेडण्यात १२ प्राथमिक शाळांच्या इमारती विनावापर आहेत. तिसवाडी, सासष्टी आणि मुरगाव या तालुक्यांत एकाही सरकारी प्राथमिक शाळेची इमारत विनावापर नसल्याचे खात्याच्या यादीतून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचाः ट्यूशन, जिमखाना, कल्चरल शुल्क 50 टक्के माफ
शाळांच्या विनावापर इमारतींची यादी
तालुके शाळा
डिचोली ११
सत्तरी १०
केपे १२
सांगे ०८
काणकोण ०६
फोंडा १५
धारबांदोडा ०६
पेडणे १२
बार्देश ०४