सर्वाधिक २,५६० कोविड मृत्यू तिसवाडीत!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कोविडमुळे राज्यातील ४,११३ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक मृत्यू तिसवाडी तालुक्यात (२,५६०), तर सर्वात कमी मृत्यू सत्तरीत (४) झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
आमदार क्रूज सिल्वा यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेले एकूण मृत्यू आणि कोविड मृतांची तालुकावर माहिती सिल्वा यांनी विचारली होती, त्यानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ती सादर केली आहे.
आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षात राज्यात एकूण १४,६०१ जणांचा मृत्यू झाला. त्यात कोविड मृतांची संख्या ७८१ होती. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षात एकूण मृत्यू १८,३३७ होते. त्यात कोविड मृत्यू २,९८२ होते, तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एकूण मृत्यू १२,५३६ होते. त्यात कोविड मृतांची संख्या ३५० इतकी होती.
कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिकच घातक ठरली. मार्च ते जून २०२१ या काळात या लाटेने राज्यात थैमान घातला होता. त्यामुळे २०२१ मध्ये कोविड मृतांचा आकडा २,९८२ झाला होता. त्यानंतर राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली.
३४ महिन्यांत ४५,४७४ जणांचा मृत्यू
जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात एकूण ४५,४७४ जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये १४,६०१, २०२१ मध्ये १८,३३७, तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये १२,५३६ जणांचा मृत्यू झाला, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तरात नमूद केले आहे.
हेही वाचाः मोपा विमानतळावर ग्राउंड सेवा प्रदान करण्यास सिलेबी इंडिया सज्ज
कोविड मृत्यू
- पेडणे : ३५
- बार्देश : १८५
- डिचोली : २५
- तिसवाडी : २,५६०
- सत्तरी : ४
- फोंडा : ३३
- सासष्टी : १,१६०
- मुरगाव : ६१
- धारबांदोडा : ११
- केपे : २३
- सांगे : १०
- काणकोण : ६