शिरोडकरांमुळे स्थानिक कलाकारांची समाजाला ओळख – गोविंद गावडे

मोरजीत निवृत्ती शिरोडकरांच्या 'नाट्यश्री पेडणे' पुस्तकाचा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंच्या हस्ते प्रकाशन सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कला क्षेत्रातील कलाकारांचा इतिहास जतन करण्याचं महान कार्य पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनी केलंय. केवळ कलाकारांवरील पुस्तक प्रकाशित करून ते थांबले नाहीत, तर कलाकारांना एकत्र आणून त्यांचा सत्कार केला आणि समाजाला त्यांची ओळख करून दिली. गोव्याची कला आणि संस्कृती जतन करण्यासाठी शिरोडकरांना कला संस्कृती खात्याकडून योग्य ते पाठबळ दिलं जाईल, असं कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले. मोरजी येथे निवृत्ती शिरोडकर यांच्या ‘नाट्यश्री पेडणे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती

मोरजी कला निकेतन, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ व गोवा मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिलला मोरजी येथील श्री कळसदेव सभागृहात निवृत्ती शिरोडकर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष तथा आमदार दयानंद सोपटे, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, अभिनेत्री अबोली पेडणेकर, लेखक निवृत्ती शिरोडकर, उपसरपंच अमित शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ आजगावकर, सुचिता शिरोडकर व मानसी शिरोडकर उपस्थित होते.

पाहुण्यांचा स्वागत सोहळा

मुख्याध्यापक राजू बोंद्रे, ओंकार गोवेकर, भक्ती धुपकर, प्रियांका साळगावकर, पत्रकार महादेव गवंडी, कृष्णा पालयेकर, वैष्णवी जोशी आदींनी कार्यक्रमाचं सुत्रसंचलन, पाहुण्यांचा परिचय केला. निवृत्ती शिरोडकर, सुचिता शिरोडकर, मानसी शिरोडकर, अनिता आरोंदेकर, संजना तळकर, काजल माळगिमणी व मक्बुल मालगिमणी आदींनी पाहुण्याना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैष्णवी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मानसी शिरोडकर, आरल मोरजे, आशी मोरजे व लेनोशा डिसिल्वा आदी बालकलाकारांनी भरतनाट्यम नृत्य सादर करून कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत केलं. पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि पुस्तक प्रकाशन करण्यात आलं.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले…

नाट्य कलाकार हजार आहेत. पूर्वी पुरुष कलाकारांनीच स्त्रियांच्या भूमिका करून ही रंगभूमी अजरामर केली आहे. याच कलाकारांनी नाट्य संस्कृती जपली. म्हणूनच राज्यात विविध नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात. पूर्वी दोन-तीन ऐतिहासिक नाटकं सादर व्हायची. आता तब्बल २४ ऐतिहासिक नाटकं सादर केली जातात.

पेडणे तालुका कलाकारांची खाण

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर बोलताना म्हणाले, आमचा पेडणे तालुका हा कलाकारांची खाण आहे. ही गोष्ट समाजाला दाखवून देण्याचं काम पत्रकार निवृत्ती शिरोडकरांनी केलं. तालुक्यातील जाणकार कलाकारांना एका माळेत गुंफण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांच्या कार्याला तोड नाही. एका पत्रकार कलाकारावर समाज कधीच टीका करत नाही. मात्र राजकारण्यावर समाजाकडून सतत टीका होत असते. राजकारणी कायमस्वरूपी नसतात. मात्र पत्रकार कलाकार हे लाईफ टाईम असतात. जिथे अन्याय होतो तिथे पत्रकार निवृत्ती शिरोडकर पेटून उठतात. शिरोडकरांनी त्यांचं लेखन असंच सुरू ठेवावं. त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.

हेही वाचाः शिवजयंतीच्या दिवशी कळंगुटमध्ये तणाव, मिरवणुकीवरुन वाद?

शिरोडकरांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा

गोवा पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष तथा आमदार दयानंद सोपटे म्हणाले, कलाकारांना एकत्र आणून त्यांची समाजाला ओळख करून देणारे पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या कार्याला माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. कलाकारांची समाजाला ओळख करून देताना त्यांनी जे कार्य केलंय, त्याला तोड नाही. असे कलाकार आणि साहित्यिक आमच्या मतदार संघात आहे हेच आमचं भाग्य.

या पुस्तकातून कलाकारांच्या पुढच्या पिढीला मिळणार प्रेरणा

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी बोलताना सांगितलं, कलाकारांचा इतिहास कायमस्वरूपी लिहून ठेवण्याचं कार्य पत्रकार निवृत्ती शिरोडकरांनी केलंय. जेव्हा या कलाकारांचे नातू पणतू ही पुस्तकं चाळतील, तेव्हा त्यांनाही यातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि नवीन कलाकार घडतील.

यावेळी अभिनेत्री अबोली पेडणेकर, सरपंच वैशाली शेटगावकर व विश्वनाथ आजगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी निवृत्ती शिरोडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.