17 वर्षाखालील 16 हजाराहून अधिक मुलांना दोन्ही लाटेत कोरोनाची लागण

‘आप’ : मुलांना तिसर्‍या लाटेपासून वाचवण्याची, गोंयकारांच्या लसीकरणाची योजना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः विनाशाकडे नेणारी कोरोनाची दुसरी लाट कायम असतानाच विशेषज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत आहे. सर्व गोंयकारांच्या लसीकरणाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडे कोणतीही योजना नाही. केवळ 15 लाख गोंयकारांचं 100 टक्के लसीकरण करण्यासाठी वास्तवात महिन्याचा कालावधी सावंत सरकारसाठी पुरेसा आहे. मात्र यासाठी गोंयकारांना भाजप हायकमांडच्या दयेवर सोडलेलं दिसतंय. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण करायला सांगितलं असतानादेखील वारंवार या गटातील व्यक्तींचं लसीकरण लसींच्या तुटवड्याअभावी थांबवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होतंय, अशी टीका आम आदमी पक्ष गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे केलीये.

हेही वाचाः औषधांच्या कमतरतेची न्यायालयीन चौकशी करा

तिसरी लाट येईपर्यंत अधिक लोकांचा जीव जाईल

45 वरील वयोगटाचंच अद्याप लसीकरण पूर्ण झालेलं नाही, ते अगोदर पूर्ण करण्याचं आदेश आरोग्यमंत्रालयाने दिले आहेत. सरकार एका वेळी फक्त 35 हजार लसींच्या कुप्या घेत आहे. परिणामी सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी दररोज मर्यादित लोकांचंच लसीकरण करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आहे. याप्रकारच्या गतीने संपूर्ण गोव्याचं लसीकरण करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि मग तिसरी लाट येईपर्यंत अधिक लोकांचा जीव जाईल, अशी भीती म्हांबरेंनी व्यक्त केलीये.

हेही वाचाः सोशल मीडिया कंपन्यांना आता भारतात नवे नियम !

आत्तापर्यंत 16 हजाराच्या आसपास मुलांना कोरोनाची लागण

दुसऱ्या लाटेने बर्‍याच तरुणांचा जीव घेतलाय, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यातच विशेषज्ञांनी भाकीत केलं आहे की, तिसरी लाट विशेषतः मुलांवर जास्त परिणाम करणारी असेल. आत्तापर्यंत सूमारे 16 हजार 246 लहान बालकांना आणि 17 वर्षांखालील तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे, जी एकूण कोरोना बाधित संख्येच्या 11.34 % टक्क्यांच्या आसपास आहे.

हेही वाचाः कोरगावातील पाण्याची टाकी स्वच्छ करा, तहानलेल्यांना पाणी द्या

म्हणूनच मुख्यमंत्री कचरतात

सावंत सरकारने जर आवश्यक प्रमाणात लसींची खरेदी केली तर राज्यातील सर्व लोकसंख्येचं लसीकरण करणं सोपं होईल. परंतु सावंत सरकारने कोणत्याही प्रकारच्या लसींच्या जागतिक निविदांचा तपशील जाहीर केलेला नाही किंवा केंद्रापर्यंत तशी मागणी पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. तसं केल्यास असं दिसून येईल की भाजप सरकार अपयशी ठरत आहे. गोवा भाजपा आपल्या हायकमांडला  नाराज करू इच्छित नाही. म्हणूनच मुख्यमंत्री सावंत गोव्याच्या हिताची मागणी केंद्राकडे मागताना कचरतात, असं म्हांबरे म्हणालेत.

हेही वाचाः स्तनदा माता, को-मॉर्बिड व्यक्तींचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य

मुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठांच्या दयेवर गोंयकारांना सोडतायत?

लसीकरणासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे कोणती योजना आहे? त्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत का? त्यांनी याबाबत काही कृतीशील पावलं उचलली आहेत का?” असे प्रश्न म्हांबरेंनी उपस्थित केलेत. तसंच सावंत,  पुन्हा गोंयकारांना आपल्या भाजपच्या वरिष्ठांच्या दयेवर सोडून देत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!