‘ईडी’चा पवारांकडं मोर्चा…महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची चर्चा !

फडणवीसांची दिल्लीवारी ; बड्या नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

पणजी : एकीकडं जीवावर उठलेला कोरोेना आणि लाॅकडाऊन यांच्याशी लढा चालु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र सत्तेत असणारी महाविकास आघाडी आणि विरोधातला भाजप यांच्यातला कडवा संघर्ष तसूभरही कमी झालेला नाही. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर सतावत सरकारला चोहोबाजुंनी घेरण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करतंय. निष्ठावंतांना घायकुतीला आणत आता तर ईडीनं थेट पवारांकडं मोर्चा वळवलाय. दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची फोनवरून वीस मिनिटं चर्चा झाली. या घडामोडींमुळं आता महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची अंतीम चढाई सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे.

भुजबळ, सरनाईक, देशमुख यांच्यानंतर आता ईडीनं थेट अजित पवारांकडं आपला मोर्चा वळवलाय. साखर कारखान्याचा इश्यु असल्यामुळं आता पवारांच्या राजकारणाची नाडी असणारी शुगर लाॅबी अस्वस्थ आहे. साखर उद्योगातल्या ब-याच घडामोंडींचे धागेदोरे बाहेर येत राहीले तर शरद पवारांसह अन्य पवार कुटूंबियही अडचणीत येतील, अशी चर्चा आहे. अर्थात अशा चौकशा आणि कारवाया यांना पुरून उरलेले पवार इतक्या लवकर हार मानणार नाहीत, हेही तितकेच खरे. मात्र संघर्ष घनघोर होणार, हे निश्चित.

या सर्व घडामोडींनी सध्या वेग घेण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांनी नुकतीच दिल्लीत घेतलेली विरोधी पक्षांची बैठक. प्रादेशिक पक्षही भाजपला रोखू शकतात, हे पश्चिम बंगालच्या निकालानं दाखवून दिल्यामुळं आता अशा पक्षांची एकत्रित ताकद उभा करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यात निश्चितच शरद पवार, ममता बॅनर्जी पुढाकार घेतील, यात शंका नाही. त्यामुळं पवारांना राज्यातच रोखण्याचा जोरदार प्रयत्न भाजपकडून होवू शकतो.

येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा काही महत्वाच्या राज्यांची निवडणूक होते आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या निकालाची पुनरावृत्ती होवू नये, याची खबरदारी तर भाजपला घ्यावीच लागेल. उत्तर प्रदेशसाठी तर ही दक्षता भाजपच्या पातळीवर अधिक महत्वाची मानली जातेय. त्यामुळं या निवडणुकांपूर्वी महाराष्टात ‘ऑपरेशन कमळ’ होवू शकत, असा जाणकारांचा अंदाज आहे. फडणवीसांची दिल्ली वारी आणि ईडीनं थेट पवारांच्या घराकडं वळवलेला मोर्चा हा त्याचाच एक भाग असु शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!