मोपा विमानतळावर सप्टेंबरपासून कौशल्य विकास केंद्र

विमानउड्डाण क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मोपा येथे गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सप्टेंबर 2021 पासून विमान वाहतुकीशी संबंधित विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण सुरू होईल.

सध्या यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू असून अभ्यासक्रम सप्टेंबर 2021मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. विमानउड्डाण क्षेत्रातील विविध विभागांतर्गत अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यातील अनेक अभ्यासक्रम अल्प मुदतीच्या कालावधीत म्हणजेच दोन ते सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करता येतील. या ठिकाणी प्रशिक्षण घेणार्‍यांना विमानतळावर नोकरीत प्राधान्य दिले जाईल. अभ्यासक्रमांची माहिती देणारे माहितीपत्रक आधीच तयार करण्यात आले आहे.

प्रस्तावित प्रशिक्षण अभ्यासक्रम

एअरसाईड ऑपरेशन्स, लँडसाईड ऑपरेशन्स, टर्मिनल ऑपरेशन्स आणि अभियांत्रिकी, एअरलाइन्स कार्गो असिस्टंट, एअरसाईड ऑपरेटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, एअरलाईन्स हायलिफ्ट ट्रक ऑपरेटर, एअरसाइड ड्रायव्हर, रिटेल सेल्स असोसिएट, कमर्शियल वेहिकल ड्रायव्हर, गार्डनर कम नर्सरी रायझर, हाऊसकिपिंग एक्झिक्युटिव्ह, लँडसाईड सिक्युरिटी, क्लीनर या पदांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध असतील. त्याचबरोबर ट्रॅफिक वॉर्डन, ट्रॉली पुलर, एअरलाइन्स बॅगेज हँडलर, आयटी कर्मचारी, अन्न आणि पेय कार्मचारी, एचव्हीएसी तंत्रज्ञ, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यांचाही यात समावेश आहे.

सुसज्ज पायाभूत सुविधा

या प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक सुविधा, मूलभूत प्रशिक्षण रचना, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, जेवणाचे हॉल आदी सुसज्ज पायाभूत सुविधा असतील. शिवाय निश्चित केलेल्या अभ्यासक्रमांच्या आधारे अभ्यासक्रमासाठी विशिष्ट उपकरणे केंद्रात बसवली जातील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच विधानसभेत सांगितले होते की, नवीन विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर 1,500 जणांना रोजगार उपलब्ध होईल.

26 जणांना जीएमआरकडून रोजगार

आजपर्यंत एकूण 26 गोमंतकीयांची थेट जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडअंतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मोपा विमानतळाच्या बांधकाम जागेवर कार्यरत असलेल्या गोमंतकीयांची संख्या 479 इतकी आहे. गोव्यातील बेरोजगार तरुणांना अशा प्रकारच्या नोकरीसाठी पात्र होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जीएमआरद्वारे कौशल्य विकास केंद्र चालवण्यात येणार आहे.

पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत लाभ

पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत प्रमाणपत्र मिळालेल्यांना नोकरीत प्राधान्य देणे विमानतळ उभारणार्‍या कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे या ठिकाणी हमखास रोजगाराची संधी आहे. दाबोळी विमानतळापेक्षा आकाराने मोठे असणारे हे नवीन विमानतळ प्रवासी टर्मिनल आणि मालवाहतूक केंद्र बनण्याच्या क्षमतेचे असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!