1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये होणार दाखल

यंदा मान्सून वेळेत येणार; हवामान खात्याचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाच्या संकटात एक चांगली बातमी आहे. भारतात मान्सूनचं आगमन वेळेवर 1 जूनला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा पहिला अंदाज असल्याचं भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम.राजीवन यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः काय चाललंय काय? एप्रिलातही पाऊस पडण्याची शक्यता?

1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून होणार दाखल

देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. याच कालावधीत मान्सूनच्या आगमनाबाबत खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतो. प्राथमिक अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 1 जूनपर्यंत धडकणार आहे. महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून १५ मे ला अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | जानेवारीत चक्क हिवसाळा! राजधानी पणजीसह सर्वदूर जोरदार पाऊस

गुरुवार ठरला प्रचंड उकाड्याचा दिवस

गुरुवार हा गोव्यासाठी प्रचंड उकाड्याचा दिवस ठरला. गुरुवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सियसच्या वर गेलंच, परंतु किमान तापमान हे 28 अंश सेल्सियसपेक्षा खाली आलंच नाही. त्यामुळे दिवसभर उकाडा सोसावा लागला. उत्तर कर्नाटकावरील चक्रिय वाऱ्याचा परिणाम गोव्यावर होताना दिसत आहे. गोव्यात तापमान पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. त्यातच आर्दता ही 81 टक्के इतकी होती. त्यामुळे अगदीच असह्य उकाड्याला लोकांना सामोरं जावं लागत होतं. येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हेही वाचाः प्रत्येक मतदारसंघात आता ‘वॉर रूम’

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज

यावर्षी देशात सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. सलग दोन वर्षापासून देशात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीही हाच अंदाज आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यात शहरांसह ग्रामीण भागांतही कोरोनाचा तांडव

अल निनोचा प्रभाव नाही

ला निना आणि अल निनोचा प्रभाव नसल्यामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडेल, असंही यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात सांगण्यात आलं होतं. सरासरीच्या 90 ते 96 टक्के प्रमाण सामान्यपेक्षा कमी, सरासरीच्या 96 ते 104 टक्के प्रमाण सामान्य आणि 104 ते 110 टक्के पाऊस पडल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक मानलं जातं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!