मान्सून मुंबईत एक दिवस अगोदरच दाखल

अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार हजेरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बुधवारी जोरदार पावसासह मुंबईत मान्सून दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रासह मुंबई आणि इतर भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यावेळी त्याआधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक (डीडीजी) डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, नैऋत्य मोसमीव वारे लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या उरलेल्या भागात, तेलंगणामध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये मार्गक्रमण करतील. त्याशिवाय ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालमध्ये देखील काही भागांमध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!