गोव्याचं ‘फुफ्फुस’ जपायला हवं : जयराम रमेश

मोले अभयारण्यासाठी बॉलीवूडमधूनही वाढता पाठिंबा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : मोले अभयारण्य परिसरात प्रस्तावित असलेल्या तीन प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक झालेले असताना बॉलीवूडमधूनही या आंदोलनाला पाठबळ मिळत आहे. अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza), रिचा चढ्ढा (Richa Chadha) यांच्या पाठोपाठ अभिनेता रणदीप हुडानंही (Randeep Hooda) सेव्ह मोले मोहिमेला पाठिंबा दिलाय. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करत आपण मोलेतील वृक्ष संहाराविरोधात असून गोव्याचं हे फुफ्फुस जपलं पाहिजे, असं मत व्यक्त केलंय.

जैवविविधतेनं नटलेल्या पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान परिसरात राष्ट्रीय महामार्ग 4-एचे रुंदीकरण, रेल्वे रुळांचे दुपदरीकरण तसेच नवीन विद्युत प्रसारकाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आलीय. यासाठी सुमारे 70 हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असून हजारो नैसर्गिक जीवांचा अधिवास हिरावला जाणार आहे. याला राज्यभरातून विरोध होत असून बॉलीवूड सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा, रिचा चढ्ढा आणि रणदीप हुडा यांनी टि्वट करून मोले वाचविण्याची विनंती केलीय.

झाडे राहिली नाहीत, तर आपण मरुन जाऊ!

झाडे राहिली नाहीत, तर आपण मरुन जाऊ आणि हा मृत्यू कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे मागणार नसल्याचं टि्वट अभिनेत्री रिचा चढ्ढा हिनं केलंय. अभिनेत्री दिया मिर्झा हिनंही मोले अभयारण्यात परिसरातल्या वृक्ष संहाराला विरोध दर्शवलाय.

विध्वंस रोखण्यासाठी गोमंतकीयांना पाठिंबा द्या!

वन आणि वन्यजीव यांच्याबाबतीत नेहमीच संवेदनशील राहिलेल्या अभिनेता रणदीप हुडानं ट्विट करून गोमंतकीयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. या प्रकल्पांसाठी सुमारे ÷70 हजार झाडांची कत्तल केली जाणार असून हा विध्वंस रोखण्यासाठी सर्वांनी गोमंतकीय आंदोलकांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं असल्याचं रणदीप हुडानं म्हटलंय.

मोले अभयारण्य म्हणजे गोव्याचं ‘फुफ्फुस’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निसर्गप्रेमावर निशाणाा साधताना माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मोलेच्या प्रश्नावर भाष्य केलंय. गोव्याचं फुफ्फुस असणार्‍या मोले परिसरातील वन संपदेचा विध्वंस होत असेल, तर निसर्गप्रेमाचा ढोंगीपणा काय कामाचा, असा सवाल रमेश यांनी उपस्थित केलाय. गोव्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी ही वन संपदा वाचवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!