पेडणे राखीव मतदार संघातील दलित वस्त्यांचा विकास करण्यास आमदार, मंत्री अपयशी

विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर समितीचा पत्रकार परिषदेत आरोप

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : पेडणे या राखीव मतदार संघातून आजपर्यंत निवडून आलेल्या आमदार मंत्र्यांनी स्वत:चा विकास केला. दलित वस्त्यांचा आजही विकास झाला नाही . गोवा मुक्त होवून ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र आजही दलित वस्त्यावर रस्ते नाहीत, स्मशानभूमी नाही, वाटा नाहीत, काही घरात वीज नाही. शिवाय काहीना पक्की घरे नाहीत. मग निवडून आलेल्या आमदार, मंत्र्यांनी विकास कुणाचा केला? असा सवाल विश्वभूषण डॉ . बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष सखाराम कोरगावकर , उपाध्यक्ष प्रकाश के. परवार, सरचिटणीस अशोक खाजणेकर, अर्जुन जाधव व तुकाराम ताम्बोस्कर उपस्थित होते .

समितीचे अध्यक्ष सखाराम कोरगावकर यांनी माहिती देताना सांगितले की, समितीतर्फे पर्वरी येथे सरकारने डॉ. आंबेडकर भवन उभारणे , दलित बांधवांच्या घरासाठी योजना देणे, जिल्हा पंचायतीत राखीवता ठेवणे, नगरपालिकेत व पंचायत पातळीवरील निवडणुकीत राखीवता, सरकारी नोकऱ्यांत १५ टक्के राखीवता, दलित बांधवासाठी सुरक्षित जागा देण्याच्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना १६ऑगस्ट २०१९ साली दिले. त्यातील काही मागण्यांना विधानसभेत मंजुरी मिळाली. आता त्याची कार्यवाही करावी, अशी मागणी कोरगावकर यांनी केली .

पेडणे या राखीव मतदार संघातून आतापर्यंत निवडून आलेल्या आमदारांनी, मंत्र्यांनी दलित वस्त्यांचा विकास केला नाही. दलितांच्या समस्या सोडवल्या नाही. जवळ जवळ दीड हजार दलितांची घरे आहेत, ज्यांना दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी दीड ते दोन लाख खर्च आहे. सरकारकडे हि योजना आहे मात्र घर दुरुस्ती करायला मिळत नाही. त्यासाठी जमिनी दलित बांधवांच्या ताब्यात नाहीत. त्या जमिनी, देवस्थान, कोमुनिनाद व जमीनदाराच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ना हरकत दाखल्याशिवाय काहीही करता येत नाही, असंही ते म्हणाले.

उपाध्यक्ष अशोक परवार म्हणाले, गोवा मुक्त होवून ६० वर्षे झाली, मात्र आम्ही इथले भूमिपुत्र स्थानिक असूनही सरकारने दलित वस्त्यावरील जमिनी आमच्या नावावर केल्या नाहीत. त्या जमिनी नावावर करा. आजपर्यतच्या आमदार, मंत्र्यांनी केवळ आपला विकास केला.

नक्की तुम्ही कुणाला पाठींबा देणार असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता अर्जुन जाधव यांनी उत्तर देताना जो दलितांचे प्रश्न, समस्या सोडवू शकतो अशा उमेदवाराला समितीचा पाठींबा असेल. त्यासाठी आम्ही आता जनजागृती करून संघटीत बनणार, असे त्यांनी सांगितले.

सरचिटणीस अशोक खाजनेकर म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांनी मागच्या वेळी इब्रामपूर गाव दत्तक घेतला होता. आज त्या गावातील दलित बांधवाना स्वत:चे घर नाही, शौचालय नाही, अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही, रस्ता नाही, वाटा नाही, मग गाव दत्तक घेण्याचा काय उद्देश होता, असा सवाल उपस्थित केला. वीस वर्षापासून बाबू आजगावकर हे दलितांचे नैतृत्व करत आहेत. मात्र आजपर्यंत कधीच दलित वस्त्यावरील विकास झाला नाही. आता समितीतर्फे आम्ही जनजागृती करणार असल्याचे सांगितले व मंत्र्याना या विषयी आता वेळोवेळी जाब विचारणार, असेही ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!