निवडणूक प्रचारात आमदारांचाही सहभाग…

आज सांगता : प्रभागांत फेऱ्यांवर उमेदवारांचा भर; प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : पंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात येत असल्याने शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी उमेदवारांकडून प्रचारावर भर देण्यात आला आहे. नावेलीत काही ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत घरोघरी प्रचार करण्यात आला. शिक्षण, आरोग्य तसेच कचरा समस्या सोडवण्याची आश्वासने उमेदवारांकडून दिली जात आहेत.
हेही वाचा:चौकशीमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले…   

पैसे देऊन मते विकत घेतली जात असल्याचा आरोप         

सासष्टी तालुक्यातील ३३ पंचायतींसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवारांकडून प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा मतदारांवर जास्त परिणाम होत असल्याने शनिवारी व रविवारी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मतदारांच्या सुटीच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. काही पंचायत क्षेत्रांत बॅनर्स लावण्याची परवानगी दिली जात नाही, तर काही ठिकाणी पैसे देऊन मते विकत घेतली जात आहेत, असे आरोप होत आहेत. नावेली पंचायतीत प्रथमच रिंगणात उतरलेल्या उमेदवाराला दहा दिवसांपूर्वी अर्ज देऊनही बॅनर लावण्याची परवानगी दिलेली नाही. वेळ्ळी पंचायत क्षेत्रातही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून पत्रकांसह पैशांचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधी उमेदवारांकडून झाला आहे.
हेही वाचा:गोव्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणार…

समाजमाध्यमांवरूनही मोठ्या प्रमाणात प्रचार

यावेळी पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांकडून घरोघरी पत्रकांचे वाटप करणे, नाक्यांवर बॅनर्स लावणे यासह समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला जात आहे. प्रभागातील मतदारांच्या मोबाइलवर प्रचार साहित्य पाठवून पंचायत क्षेत्रात केल्या जाणाऱ्या विकासाची माहिती दिली जात आहे. स्टेटस लावून, गावांतील विविध ग्रुपवर, फेसबुकवरून प्रचार केला जात आहे. याशिवाय काही उमेदवारांनी पंचायतीसाठी मिळालेले चिन्ह लक्षात राहावे म्हणून त्या चिन्हाची छोटी प्रतिकृती मतदारांच्या घरोघरी दिली आहे.   
हेही वाचा:चिमुरडीचा खून करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल…      

आमदारांकडून प्रचार            

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हे नावेली मतदारसंघातील काही पंचायत प्रभागांत उमेदवारांसोबत फिरून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. सासष्टीतील बहुतांश भागात आमदारांकडून पंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पॅनल तयार करण्यात आली आहेत. पंचायती हाती आल्यास विकासाच्या गतीला वेग येणार असल्याने व पुढील विधानसभा निवडणुका चांगल्या जाऊ शकतील, असा अंदाज बांधून आमदारांकडूनही कार्यकर्त्यांना पंचायत निवडणुकीत पाठिंबा दिला जात आहे.
हेही वाचा:महिलांविरुद्ध गुन्ह्यांत केवळ सातजणच दोषी…

शिक्षण, घनकचरा व्यवस्थापनाचे आश्वासन

पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना याआधी गावातील विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासत असायची. मात्र, राज्य सरकारकडून निधीमध्ये वाढ केल्यानंतर कोट्यवधींचा निधी केंद्र व राज्याच्या विविध योजनांतून खर्च करता येतो. याचाच फायदा घेत उमेदवारांकडून महिला सुरक्षितता, सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, योजनांचा लाभ देत कृषी उत्पन्न वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, शिक्षण सुविधा वाढवणे, कचरा समस्या सोडवून प्रभागात स्वच्छता राखण्याची आश्वासने उमेदवारांकडून दिली जात आहेत. 
हेही वाचा:निलेश राणेंची दीपक केसकरांना ‘ऑफर’, म्हणाले ‘ड्रायव्हरची जागा’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!