आमदार प्रसाद गांवकरांचे बंधू, कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केलं स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सांंगेचे आमदार प्रसाद गांवकर यांचे बंंधू संदेश गांवकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत रीतसर काँग्रेस प्रवेश केला.

हेही वाचाः दुर्दैवी! रविवार ठरला घातवार

या कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मळकर्णे पंचायतीचे पंच सदस्य असलेले संदेश गांवकर, गजानन रायकर, माजी पंच सदस्य आणि विद्यमान सरपंच लीओना रॉड्रिगिस यांचे पती बाप्तिस्ट रॉड्रिगिस, संतोष नाईक, अनिल मठकर, सर्वेश नाईक, पावटो गांवकर, प्रज्योत कुर्डीकर, कायतान बार्रेटो यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मळकर्णेच्या सरपंच लीओना रॉड्रिगिस या काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

हेही वाचाः कोरोना रुग्णांमध्ये ‘बोन डेथ’ लक्षणांमुळे डॉक्टर चिंतेत

भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश

पक्ष प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचं म्हणालं. भाजप सरकारची वाटचाल ही गोव्याला संपवून टाकण्याकडे चालली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून आम्ही पाहतो की, साळावली धरण, वनाधिकार प्रश्न, संजीवनी साखर कारखाना असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही लढलो. पण कोणताच प्रश्न त्यांनी सोडवलेला नाहीच, उलट त्यासाठी प्रयत्नही केलेले नाहीत. उलट प्रत्येक ठिकाणी अडवणूक केलेली आहे. सांगेतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष नक्कीच सहकार्य करील, असा विश्वास आहे आणि त्यासाठीच आम्ही पक्ष प्रवेश करून काँग्रेसला बळकट करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचाः आमदाराच्या भावाने काँग्रेस प्रवेश केला; आमदार कधी करणार?

गेली वीस वर्षं आपण भाजपसाठी कार्य करत

गेली वीस वर्षं आपण भाजपसाठी कार्य करत आहे. पण त्याची दखल त्यांनी कधी घेतली नाही. गेल्या वेळी निवडून आलेले आमदार प्रसाद गांवकर यांचं काम आम्ही पाहतो. भाजप सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळत नसतानाही स्वतःच्या बळावर त्यांनी अनेक कामं मार्गी लावायचा प्रयत्न केला. धडपड करून समाजासाठी कार्य करत असल्याने लोकही त्यांच्या सोबत आहेत. हे सर्व पाहून त्यांच्या पाठीशी रहायचं असा ठाम निश्चय केला. तसंच सध्या देशात आणि गोव्यात जे काही भाजपने चालवले आहे ते सर्व लोकविरोधी आहे. लोकांच्या हाती पैसा नाही, खायचे वांदे असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ करून लोकांना अधिकच कंगाल करून टाकलं आहे. खाणी बंद, गृहआधार योजना रखडली. अशा अनेक प्रकारे या सरकारने जनतेला पिडलं आहे. त्यामुळेच आता काँग्रेस सोबत राहून भाजप सरकारला घालवायचं आहे, असं अनिल मठकर म्हणाले.

हेही वाचाः मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामींचं निधन

भाजपचं खरं रूप दिसू लागलं

कार्यकर्ते आणि मतदारांच्या आधाराने अपक्ष म्हणून निवडून येत भाजप सरकारला पाठिंबा दिला. पण आमदार प्रसाद गांवकर यांच्यावर भाजप सरकारने सतत अन्याय केला आहे. संयमी स्वभावाच्या प्रसाद गांवकरांनी जाऊ दे, होईल व्यवस्थित असं म्हणत वाट पाहिली. पण आता भाजपचं खरं रूप दिसून आल्यानंतर आम्ही सर्वांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेऊन आज पक्षप्रवेश केल्याचे संतोष नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचाः PHOTO CAPTION: भारतीय जनता युवा मोर्चा वाळपईतर्फे वृक्षारोपण

तेव्हा या मतदारसंघात चालत फिरून लोकांचं मन वळवलं

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करून म्हणाले, मला सांगे मतदारसंघ नवीन नाही. मी मुख्यमंत्री, वीजमंत्री असताना गावातील रस्ते, वीज, पाणी अशा अनेक समस्या सोडवण्यात आल्या आहेत. पूर्वीचं सरकार या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्यामुळे सांगेवासीयांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी या मतदारसंघात चालत फिरून लोकांचं मन वळवलं आणि त्यांना दिलेल्या शब्दानुसार निवडणुकीनंतर आठव्या दिवशी तिथे रस्त्यांचं काम हाती घेऊन पूर्ण केलं. आणि त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने तिथे दारूची फॅक्टरी सुरू करण्याचा घाट घातला जो सांगेवासीयांनी उधळून लावला असं कामत म्हणाले. तसंच फा. स्टेन स्वामी या ८४ वर्षीय बुजूर्ग सामाजिक कार्यकर्त्यांना कोणतंही कारण नसताना तुरुंगात टाकून अमानवी वागणूक दिल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर तीव्र चीड व्यक्त केली.

हेही वाचाः IFFI | 52 व्या इफ्फीच्या तारखा ठरल्या

चोडणकरांंनी केलं सर्वांचं स्वागत

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केल्यानंतर बोलताना सर्वप्रथम दिवंंगत बुजूर्ग आदिवासी लोकांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, शिक्षक आणि विचारवंत फा. स्टेन स्वामी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. तसंच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणुकीत तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचं सांगितलं. तसंच बंधू आणि कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश करणं म्हणजे आमदाराचा पक्षप्रवेश होईल की नाही हे तुम्हीच ठरवा असं सूचक उत्तर दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!