मुख्य सचिवांसह आमदारही सायबर क्राईमचे शिकार

परिमल राय याचे ईमेल हॅक; तर विल्फ्रेड डिसा यांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी/मडगाव: इंटरनेटच्या ‘आभासी’ पद्धतीकडे वळताना त्यातील धोकेही समोर येऊ लागले आहेत. अनेक सामान्यांची भावनिक, आर्थिक फसवणूक ऑनलाइन माध्यमातून झाल्यानंतरही निद्रिस्त असलेल्या सायबर गुन्हेगारी विभागाला आता राज्याचे मुख्य सचिव आणि नुव्याच्या आमदारांना बसलेल्या फटक्यानंतर तरी जाग येईल, अशी आशा आहे. 

राज्याचे मुख्य सचिव परिमल राय याचे ईमेल हॅक

राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांचा ईमेल एका अज्ञात व्यक्तीने हॅक करून बनावट ईमेलद्वारे राय यांच्या मित्र व इतरांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे विभागाच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्य सचिव परिमल राय यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने राय यांच्या ईमेल खात्याचे बनावट ई-मेल खाते तयार केले. तसेच या ईमेलद्वारे राय यांच्या मित्र तसेच कुटुंबीयांकडून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९, ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६,६६सी, ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल

अशाच प्रकारची तक्रार नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.  डिसा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आमदार विल्फ्रेड डिसा या नावे फेसबुक या माध्यमावर बनावट प्रोफाईल तयार करण्यात आली आहे. या प्रोफाईलसाठी आपल्या फोटोंचाही वापर करण्यात आलेला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!