होय, राष्ट्रवादीकडून लढण्याची ऑफर : आमदार डायस

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : आमदार चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. त्याला कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी दुजोरा दिला आहे. ‘तशी ऑफर होती; मात्र आपण ती नाकारली. भाजपने तिकीट वाटपावेळी नाकारलं तरच त्याविषयी विचार करता येईल’, असे डायस यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार डायस पुढे म्हणाले,
‘कुंकळ्ळीतून याआधीही भाजपने निवडणूक जिंकली आहे. आता परिस्थिती बदलली असून, लोक उमेदवाराची काम करण्याची ताकद पाहतात. आपल्यासोबत असलेले कार्यकर्ते आताही चांगले काम करत आहेत. कुंकळ्ळीतील विकासकामांसाठी सरकारकडून चांगले सहकार्य लाभले आहे. लोकांच्या आग्रहामुळे मी पुन्हा निवडणूक लढविणार आहे. भाजपच्या तिकिटावर लढल्यास लोक नाकारतील, अशी भीती वाटत नाही. यापुढील निवडणुकीत नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा आणि वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स हे अपक्ष निवडणूक लढवतील. इतर आठ जण मात्र भाजपच्या तिकिटांवरच लढतील’.
एकूणच जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशे राज्यातील राजकीय घडामोडींचे वारेही वेगानं वाहू लागल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजप डायस यांना उमेदवारी देणार की नाही, आणि दिली नाहीच तर ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.
हेही वाचा –
मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यावर गडकरींचा तो व्हिडीओ व्हायरल
जबरदस्त! आठवड्याला ३ सुट्ट्या देण्याच्या मोदी सरकारकडून हालचाली?