डायरेक्ट चंद्रार फेम एमजेच्या भावानं लिहिलेलं पत्र प्रत्येकानं वाचलंच पाहिजे!

वर्षाच्या सुरुवातीलाच एमजे यांच्या जाण्याने अनेकजण हळहळले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : 4 जानेवारीला मुक्त पत्रकार आणि समाजसेवक महादेव जोशी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. गेले अनेक दिवस आजारी असणाऱ्या महादेव जोशींच्या निधनाच्या वृत्तानं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. या महादेव जोशींच्या भावानं त्यांना एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा देतानाच महादेव जोशींच्या एकूणच आयुष्याचं चित्र उभं केलंय. प्रत्येकानं वाचावं असं हे पत्र आम्ही सर्व वाचकांसाठी पुढे आणत आहोत. महादेव जोशींच्या भावानं लिहिलेलं पत्र पुढीलप्रमाणे….

प्रिय दादा…

डायरेक्ट चंद्रार..

लिहायला कुठून सुरुवात करावी तेच सुचत नाही तरीही प्रयत्न करतो…

डायरेक्ट चंद्रार फेम महादेव म्हणजे माझा दादा मोठा भाऊ संदेश. जन्म 1981लहानपणापासूनच शिक्षणात हुशार त्यात गाण्याची आवड.. संगीत शिक्षण नाही पण गायन उत्तम…

आठवी झाली. पौरोहित्य शिकण्यासाठी पाठशाळेत गेला तिथे मन रमेना म्हणून घरी माघारी येऊन पुढील शिक्षण आंबेडे येथे शिकू लागला 10 वी झाली. मग वाळपई हायर सेकंडरीला horticultureला ऍडमिशन घेतलं. शिक्षणासोबत समाजकार्याची निस्सीम आवड आम्हाला दोघांनाही बाबांनी नसानसात भिनवलेली. त्यामुळे आम्ही माणसे जोडत गेलो. संदेशाला नाटकात काम करायची फार आवड. कॉलेजमध्ये बऱ्याच एकांकिकेतून बक्षिसे, प्रशस्तिपत्रके मिळवली. बीएससी एग्रीझाली…आमची घरची परिस्थिती तशी म्हणायला गेलो तर बेताचीच होती कारण बाबा पौरोहित्य करणारे अन वडिलोपार्जित दुर्लक्षित बागायती… दुर्लक्षित म्हणजे बागायतीत असलेली सुपारीची नारळाची लागवड आजोबानी केलेली. बरं कमावणारा एक खाणारी सहा तोंडं. भागतही नव्हतं.

हा विचार करून संदेशने SMD मध्ये superviser म्हणून दिसावडा तत्वावर नोकरी पत्करली.. त्यावेळी जेमतेम महिन्याकाठी 2000 मिळायचे त्याला पण खूश असायचा तो… Supervision करता करता वेल्डिंग शिकून घेतलं अन एक चांगला वेल्डर म्हणून नावारूपास आला… मग तो दोन्ही कामं करायला लागला सकाळसंध्याकाळ supervision अन रात्री 3-4तास त्याच कंपनीत वेल्डर म्हणून काम करू लागला.. मालकांनाही त्याच कामं आवडलं अन पाच पटींनी पगारवाढ करून दिली अन त्याबरोबरच फॅक्टरीतील जबाबदारीही सोपविली…

काळ आला होता, पण वेळ…

संदेश उमेदीने काम करू लागला… रात्रपाळीच्या कामगारांनाही ओव्हरटाईम करून हॅन्डल करत असे तो… अशातच त्याच्या आयुष्यात एक काळा दिवस उजाडला. तो म्हणजे दिनांक 11 जानेवारी 2006. सकाळचं काम संपवून तो घरी आला आणि परत कामावर जाण्यासाठी कामगारांना काही खायला घ्यावं म्हणून अर्धा तास वाळपईत थांबला.. गरमागरम सामोसा घेऊन तो कामगारांना घेऊन जातं असताना रेडेघाटीत त्याचा भीषण अपघात झाला… त्यात त्याचे दोन्ही पाय मोडले होते. उजव्या पायातील जांघेतील हाड चामडी फाटून तुटून बाहेर आलं होतं.

नंतर GMCमध्ये नेऊन त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यासोबत मी होतो पहाटे 4वाजता डॉक्टर आले. म्हणू लागले कि, ऑपरेशन करायचं. या वस्तू ताबडतोब घेऊन या… बाबांना पोचायला तासभर होता.. मी मेडिकल स्टोर वर गेलो.. त्यावेळी बांबोळीत सगळंच विकत घ्यावं लागत होतं… मी ती लिस्ट दिली. माझ्या खिशात अवघे 3000 रुपये. पण बिल झालं 9700रुपये. काय करावं काही कळेनासं झालं.. मी माझ्या गळ्यातील सोन्याची चेन ठेवा म्हणून देऊ केली. बाबा आल्यावर पैसे देतो असं सांगितलं. पण तो मेडिकलवाला ऐकेना.. काहीच सुचेनासं झालं रडू येऊ लागलं.

…आणि जिवात जीव आला

एकतर डॉक्टरांनी ताबडतोब ऑपेरेशन करूया म्हणून सांगितलेलं कारण तो OT मधेच होता. मी देवाचा धावा करू लागलो. इतक्यात त्याचे मालक तिथे पोहोचले. अन त्याची खबरबात घेऊ लागले मी सगळं सांगितलं.. त्यांनी ताबडतोब 15000 रु. मला दिले. मी मेडिकलचे साहित्य घेऊन OT मध्ये दिले. अन् 6 तासांचे त्याचे ऑपेरेशन करून त्याला बाहेर आणले. त्यावेळी आमच्या जीवात जीव आला… त्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून तो हळूहळू चालू लागला अन 4 महिन्यांनी गाडी रुळावर आली… खरे म्हणजे त्याची इच्छाशक्ती न देवाचा आशीर्वाद यामुळेच तो चालू शकला… सहा महिन्यांनी कामावर पुन्हा रुजू झाला…

पण थंडीच्या दिवसात खूप त्रास व्हायचा त्याला. तश्यातच तो बिनबोभाट काम करायचा… आम्हाला कधीही सांगत नसे.. यातच त्याला लोकनृत्याची आवड…

वेळ काढून नेहरू युवा केंद्र जॉईन केलं. अन दिवली नृत्य शिकवू लागला.. त्यावेळी नेहरू युवा केंद्रातर्फे हजारीबाग येथे जाऊन कार्यक्रमही करून आला.. चार पैसेही गाठीशी मिळाले… काही दिवसांनी घरात टाईल्स चे काम सुरु होते cutting machine ला शॉक लागून संदेशचा उजवा पायातील rod पुन्हा बेंड होऊन fracture झाला.. परत GMC मध्ये दाखल करून जांघेच operation करण्यात आलं..

काही दिवसांनी पूर्ववत होऊन कामावर रुजू झाला. पण पूर्वीसारखी चपळाई नव्हती .पायही साथ देत नव्हता. व्यवस्थित शॉक लागल्यामुळे डॉक्टरांनी विजेच्या उपकरणांजवळ जाण्यास सक्त मनाई केली… हळूहळू कामावरील लक्ष विचलित होऊ लागले… अन कालांतराने त्याने ते काम सोडले.

सामान्य मुलगा ते असमान्य पत्रकार

काही दिवसांनी त्याच्या जिगरी दोस्त अमर पाटील त्याला भेटला आणि त्याच्या मनोरंजनाच्या दुनियेत त्याला घेऊन गेला… Goa365 या न्यूज चॅनलवर त्याला कामावर घेतले… पूर्वी तो ऑफिसमध्ये असायचा. तिथे editing वगैरे व्यवस्थित शिकून घेतले. पण बोलबच्च्यन स्वभाव असल्याने फील्डवर्कची जबाबदारी स्वीकारून न्यूज रिपोर्टर झाला… तिथून मग ingoa marathi, prudent, गो chennel या विविध चॅनल्सवर रिपोर्टरचं काम करू लागला…

दिवसरात्र फील्डवर जाऊन operationचे ते पाय खूप दुखायचे. सूजही यायची, त्यातच कुणीतरी एकाने सांगितलं कि दारूचा घोट घेतला कि दुखायचं थांबतं. आणि त्याला दारू पाजली. त्यालाही ते खरच वाटू लागलं. मग पेग रिझवू लागला. फक्त दुखणारं अंग शमन होण्यासाठी… घरची बागायतीची कामही तोच करायचा त्या मोडक्या अवस्थेत हे विशेष.

कालांतराने त्याच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली… ज्यावेळी तो न्यूज गोळा करण्यासाठी जायचा तेव्हा त्याला गोरगरिबांच दुःख दिसायचं. राजकारण्यांचे गेम कळू लागले म्हणून फेसबुकच्या माध्यमातून गरीब जनतेची दुःख त्यांच्या व्यथा लोकांसमोर मांडायचा. फेसबुक लाईव्ह करु लागला. राजकारणी लोकांवर सूड घेतात हे त्यानं पाहिलं. मग यांना कुठे पाठवायचं तर फुर्रर्रर्र डायरेक्ट चंद्रार हे अचानक त्याला आठवलं. अन याच टॅगलाईनमुळे लोकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. नामकरण महादेव जोशी वरून MJ असं झालं.. तो कुणाकडूनही एक पैसा न घेता सत्य ते लोकांना सांगायचा.. हा पण त्याची भाषा रफ अँड टफ.. शिव्यांची लाखोलीच वाहायचा हे आम्हालाही पटत नसे. सांगूनही ऐकत नसे.. जणूकाही खोट्याआड त्याच्या मनात लाव्हा शिव्यांच्या रूपात बाहेर पडायचा…

शेवटच्या काही लाईव्हपैकी महादेव जोशींनी केलेलं फेसबुक लाईव्ह

त्यातच इंग्लंड मधील एक डॉक्टरांनी त्याला सांगितले कि महादेव तुझ्याकडे फक्त 7महिने शिल्लक आहेत. कारण या गोरगरिबांना मदत करण्याच्या नादात पेगचं प्रमाणही वाढत गेलं. अन लिव्हर प्रॉब्लेम सुरु झाला… हॉस्पिटलमध्ये असतानाही त्याच्यातला तो मदतगार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तिथेही व्हिडीओ काढायचा. व्यसनामुळे बाबाही त्याच्यावर ओरडायचे. पण तो म्हणायचा हा MJ कोण ते तुम्हाला मी गेल्यावरच कळणार.. अन तसंच झालं..

दिनांक 4 जानेवारीला रात्री तो आम्हाला सोडून गेला.. पण पुढच्या दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुकवर, वृत्त वाहिन्यांवर, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या अन अंत्यदर्शनासाठी आलेले हजार बाराशे लोक MJ काय होता याची साक्ष देत होते. आई बाबांनाही रडू अनावर होत होतं. आपला मुलगा कसाही असला तरी शेवटी आपलं रक्त असतं. अन् बापाने मुलाचा अंत्यसंस्कार करायचा पडल्यावर काय होईल??

शेवटी इतकंच सत्य आहे की माझा भाऊ मला एकटं टाकून गेला. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून गेला. त्या चंद्रावर जाऊन हसत असेल… आमची त्रेधातिरपीट पाहत असेल.. संदेश तू जिथे कुठे असशील हसतमुख राहा कारण देवाने तुला स्वर्गाचं द्वार उघडं केलेलंच असेल अन् कदाचित तो स्वतःच तुला स्वर्गात न्यायला आला असेल… पण जिथे असशील तिथे खूश राहा…

मी इथे आईबाबा, वाहिनीची काळजी घेईन. त्यांना कधीच अंतर देणार नाही. हे मी तुला वचन देतो… स्पृहा तुझी आठवण काढते. वेळ मिळेल तर त्या चंद्रावर येऊन तिला hiii म्हण कधीतरी..

तुझाच भाऊ
संकेत जोशी

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!