हॉटेलच्या हितासाठी सरकारी निधीचा गैरवापर? जलस्त्रोत खात्याकडे तक्रार

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : मझलवाडा-हणजूण येथे एका हॉटेलच्या हितार्थ सरकारी निधीचा गैरवापर करून नाला व संरक्षक भिंत उभारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यास स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवी हरमलकर यांनी आक्षेप घेतला असून याप्रकरणी जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.
काय प्रकरण?
सर्व्हे क्रमांक 606/1 मध्ये नाला व संरक्षक भिंत उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बांधकामासाठी सरकारी निधीचा गैरउपयोग होत असून केवळ एका वैयक्तिक प्रभावशाली व्यक्तीसाठी हा प्रकार जलस्त्रोत खात्याकडून चालला आहे. असे रवी हरमलकर यांनी आक्षेपवजा तक्रारीद्वारे खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गंभीर आरोप
हा नाला व संरक्षक भिंत उभारण्याची कोणतीच गरज नाही. त्यामुळे विनाकारण सरकारी तिजोरीवर भार पडेल, असा दावाही हरमलकर यांनी केला आहे. हे ज्या व्यक्तीसाठी बांधकाम केले जात आहे. ती व्यक्ती खूपच प्रभावशाली असून त्यांच्या फायद्यासाठी अधिकार्यांवर दबाव आणला जात आहे. विशेष म्हणजे, स्थानिक आमदार किंवा पंचायतीने या नाल्यासाठी किंवा संरक्षक भिंतीसाठी सरकार पातळीवर शिफारस केलेली नाही. तसेच प्रस्तावित बांधकामाच्या दिशेने सर्वे क्रमांक आणि इतर गोष्टींबद्दल चुकीचे निवेदन केले गेले आहे. हा प्रस्ताव भ्रामक असून या प्रकरणी खात्याने लक्ष घालून हा प्रस्ताव बाजूला करून बंधकाम बंद करावे, अशी मागणी हरमलकर यांनी केली आहे.