मंत्री​-आमदारांत बैठकीआधी जुंपली

लोबो-दीपक, गोविंद-बाबूशमध्ये वादावादी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संध्याकाळी भाजप मंत्री, आमदारांची बैठक बोलावली होती. पण, फडणवीस आणि इतर नेते बैठकीसाठी सभागृहात येण्यापूर्वी मंत्री मायकल लोबो आणि दीपक प्रभू पाऊस्कर तसेच मंत्री गोविंद गावडे व आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पाऊस्करांकडून कामं होत नाहीतः लोबो

मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांच्याकडून आपली कामे होत नसल्याचा आरोप करत मंत्री मायकल लोबो यांनी सभागृहातच पाऊस्कर यांना छेडले. यावरून या दोघांत वाद पेटला. वाद वाढल्यानंतर मंत्री लोबो बैठक सोडून बाहेर पडण्यास सज्ज झाले होते. पण, एका मंत्री आणि आमदाराने मंत्री लोबो यांना थांबवून ठेवल्याचं समजतं. पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनीही मंत्री गावडे यांच्याकडून कामं होत नसल्याचा दावा करत भांडण उकरून काढलं. यावरून मंत्री गावडेही संतप्त झाले होते. पण उपस्थित काही आमदारांनी त्यांना शांत केल्याचं समजतं.

भांडण झालं असल्यास तुम्हीच शोधून काढा

बैठकीत पत्रकारांनी मंत्री लोबो यांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. मंत्री पाऊस्कर यांनी लोबो आणि आपल्यात भांडण झालंच नसल्याचा दावा केला. मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी भांडण झालं असल्यास तुम्हीच शोधून काढा, असं उत्तर पत्रकारांना दिलं. मंत्री गावडे यांनी या भांडणांसंदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही, असं स्पष्ट केलं. एक-दोन आमदारांनी मंत्री, आमदारांत वादावादी झाल्याचं मान्य केलं. पण, त्यांच्यातील वाद गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण मंत्री, आमदार एकत्र आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाद होतच असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोबोंमुळे इतरांना भीती

मंत्री मायकल लोबो गेल्या काही दिवसांपासून आपल्याच पक्षासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवरही निशाणे साधत आहेत. त्याचा फटका पक्षासह आपल्याला बसण्याची भीती काही आमदार वारंवार पक्षाकडे व्यक्त करत आहेत. तरीही पक्षाने लोबोंबाबत नरमाईची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील नाराजी वाढत चालल्याची माहिती एका आमदाराने दिली.

हा व्हिडिओ पहाः NO CASINO IN PEDNE | चांगल्या प्रकल्पांचं स्वागत, मात्र पेडणेत कॅसिनोला विरोधच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!