खाणी सुरू करण्यासाठी सर्व पर्याय खुले : मुख्यमंत्री

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजी : राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांसाठी खाणी सुरू होणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लीज भागात जो माल काढून ठेवला आहे, त्याच्या वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. परंतु मालाची वाहतूक करण्याची मुदत मे महिन्यात संपली आहे. ही मुदत वाढवून मिळावी यासाठी काही खाण कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुदत वाढवून देण्याच्या मागणीला सरकारचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला असता उत्तरादाखल मुख्यमंत्री बोलत होते.
खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही लोक याला विरोध करतात. विरोध करणार्या लोकांना जाब विचारण्याची गरज आहे. सरकारलाच याबाबत प्रश्न का विचारला जातो, असा सवालही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.