परप्रांतीयांची दादागिरी! सांताक्रूझमध्ये बळकावली जमीन

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी
पणजी : गोव्यात येऊन इथली आडनावे धारण करण्याचा प्रकार तसा प्रचलितच आहे. परंतु इथे मात्र स्थिरस्थावर होऊन आता मूळ गोमंतकीयांच्या जागेतच अतिक्रमण करून वरून मूळ जमिन मालकाला धमकावण्यापर्यंत काहीजणांची मजल गेलीय. सांताक्रुझात असेच एक प्रकरण उघडकीस आलंय. इथे तर चक्क स्थानिक ग्रामपंचायत अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालतंय आणि तक्रारदार मूळ गोमंतकीय व्यक्ती मात्र न्यायासाठी भरकटतेय.
सांताक्रुझातील सांत आगुस्तीनो मरड येथील सिडनी सुसान फर्नांडिस हा गोंयकार गेले काही महिने आपल्याच कालापूर येथील सर्वे क्रमांक 28/1 या जागेतील बेकायदा अतिक्रमणाविरोधात लढत आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही तक्रार गोविंद नाईक, चंद्रकांत नाईक आणि अशोक नाईक यांच्याविरोधात केलीय. कुठलाही परवाना नाही. पंचायतीचे लायसन्स नाही. रस्त्याला सेडबँक ठेवण्यात आलेला नाही. हायटेन्शन वायर जात असतानाही तिथे उघडपणे बेकायदा बांधकाम सुरू आहे. ग्रामपंचायतीने मात्र या सर्व प्रकारांबाबत डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. या कुटुंबियांची नावे जरी नाईक असली तरी त्यांच्या मूळ गोमंतकीय असण्याबाबतच तक्रारदाराने संशय व्यक्त केलाय. आपल्याच जमिनीतील अतिक्रमणाविरोधात तक्रार करायला गेल्यास हे लोक थेट अंगावरच धावून येतात आणि चक्क शिवीगाळ करून कारवाई करूनच दाखवा, अशी धमकीही देतायेत, असे सिडनी सुसान फर्नांडिस यांचे मत आहे.
पणजी बीडीओकडे याचिका, संबंधितांना नोटीस
आता मात्र अतिरेकच झाला, असे म्हणून सिडनी फर्नाडिस यांनी पणजी बीडीओकडे रितसर याचिका दाखल केली आणि या एकूणच बेकायदा प्रकरणी जबाब मागीतला, तेव्हा कुठे सरकारी यंत्रणेला जाग आली. तिसवाडीचे बीडीओ अनिल धुमस्कर यांनी तत्काळ प्रतिवादींना नोटीस जारी करून ताबडतोब बांधकाम स्थगीत ठेवण्याचे आदेश जारी केले. सात दिवसांत संबंधीत बांधकामाची कागदपत्रे घेऊन या, असेही या नोटीशीत म्हटले आहे.
ग्रामपंचायत का पाठिशी घालतेय?
बीडीओला जाग आली तरी ग्रामपंचायतीकडून मात्र कोणतीही कृती केली जात नाही. ग्रामपंचायत अशा बेकायदा बांधकामांना कशी काय आश्रय देते, असा सवाल सिडनी फर्नांडिस यांनी केलाय.