वरिष्ठ नेत्यांकडून मायकल लोबोंना ‘बौद्धिक’

जाहीर वक्तव्यांमुळे स्थानिक नेत्यांत नाराजी, मंत्री मॉविन गुदिन्होंना टार्गेट केल्यामुळे ‘समज’

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : पक्षशिस्तीच्या बाबतीत कडक भूमिका घेणार्‍या भाजपला मंत्री मायकल लोबो हे वरचढ ठरू लागलेत. डिजिटल मीटरच्या विषयावरून त्यांनी वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंवर जाहीर टीका केल्यानं पक्षानं याची गंभीर दखल घेतलीय.

कळंगुटचे आमदार तथा घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो हे आक्रमक स्वभावासाठी परिचित आहेत. मात्र त्यांचा हाच आक्रमक स्वभाव भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागलाय. त्याला कारणही तसंच आहे. डिजिटल मीटरची सक्ती करण्याच्या विषयावरून त्यांचं वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंशी बिनसलंय. या संदर्भात जाहीर टिप्पणी करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

मायकल लोबो यांनी स्वपक्षाच्याच मंत्र्याला जाहीर आव्हान दिल्यानं सरकारची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपक लोबो यांच्यावर ठेवण्यात आलाय. यापूर्वीही लोबो यांनी अशी आगळीक करून वरिष्ठांची नाराजी ओढावून घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती डिजिटल मीटरच्या निमित्तानं झालीय. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी लोबो यांना खडेबोल सुनावत शिस्तीत राहायची ताकीद दिलीय. लोबो यांची आक्रमकता केवळ डिजिटल मीटरपुरती मर्यादित नाही. उमेदवारीच्या विषयावरूनही त्यांनी जाहीर विधानं केल्यानं ते पक्षाच्या नाराजीस पात्र ठरले.

बार्देस तालुक्यावर वर्चस्व ठेवण्याची लोबो यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातूनच स्वत:ला कळंगुटमधून, पत्नी डिलायला साळगाव किंवा शिवोलीतून आणि त्यांचे समर्थक तथा झेडपी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांना पर्वरीतून उमेदवारी मिळावी, यासाठी लोबो तयारीला लागलेत. मात्र भाजपच्या कोअर टीमला तसंच संघटनात्मक नेत्यांना लोबोंचा हा पवित्रा रुचलेला नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात दोन वेळा त्यांना पक्षातर्फे समज देण्यात आलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत केळंगुटमधून भाजपच्या उमेदवारीसाठी उद्योजक रिकी डिसोझा इच्छुक असल्याचा रागही लोबोंच्या मनात खदखदतोय. शिवाय टॅक्सीवाल्यांची नाराजी लोबोंना निवडणुकीत परवडणारी नाही. ही सगळी कोंडी ते थेटपणे व्यक्त न करता, एखाद्या मंत्र्यावर टीका करून आपला राग शांत करतात. मात्र पक्षातर्फे वारंवार मिळणार्‍या बौद्धिकामुळे लोबोंचीच प्रतिमा खलनायक बनू शकते, हे लोबो यांनी ध्यानात घ्यायला हवं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!