म्हादईप्रश्नी या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा, 2 दिवसांची मुदत

मुख्यमंत्री म्हादईला आई मानतात, तर पंतप्रधानांकडे चर्चा का नाही? बेकायदा खाणींमध्येच रस असल्याचा टोला.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : म्हादईच्या बाबतीत सरकारचा कृती अहवाल मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांत स्पष्ट करावा, अन्यथा पायउतार व्हावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी (Vijai Sardesai) केलीय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी (Prakash Jawdekar) म्हादईच्या विषयावर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हादईवर जे काही बोलायचंय ते मुख्यमंत्री बोलतील, असं म्हटल्यानं हा वाद पुन्हा उफाळून आलाय.

तर विधानसभा बरखास्त करा
केंद्रानं गोव्याला गृहीत धरलं आहे. गोव्याचा घात करणाऱ्या घातकी मंत्र्यानं आता नवं नाटक सुरु केलंय. केंद्र सरकार पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवर गोवेकरांना फसवत आहे. जागृतीसाठी नाही तर शेतकऱ्यांना फसविण्यासाठी जावडेकर गोव्यात आले होते, अशी टीका सरदेसाईंनी केलीय. म्हादईच्या विषयावर गोवा सरकार विकलं गेलं असल्याचा आरोपही विजय सरदेसाईंनी केलाय. प्रसंगी विधानसभा बरखास्त करा. म्हादईच्या प्रश्नावर लोकांमध्ये जाऊ, असं आव्हानही सरदेसाईंनी दिलंय.

राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन
पाणी वाटप लवादाच्या आदेशाप्रमाणं गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या अभियंत्यांचं पथक तयार करणं आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांच्या देखरेखीखाली पाण्याचं वाटप होऊ शकतं. मात्र या पथकाची अजून नेमणूक झालेली नाही. त्याआधीच म्हादईचं पाणी कर्नाटकला वळविण्यात आलंय. सरकारच्या जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनीही ही गोष्ट मान्य केलीय. तरी सरकार झोपा काढत असल्याचा आरोप सरदेसाईंनी केलाय. म्हादई आणि इतर विषयांवर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत म्हादईचा प्रश्न आमच्या अजेंड्यावर असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पंतप्रधानांबरोबर मायनिंगवर चर्चा, मुख्यमंत्र्यांना आईचा विसर
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी खाणींबद्दल चर्चा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हादईबाबत पंतप्रधानांकडं एक शब्दही काढला नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) म्हादईला आई मानतात. आपल्या आईबद्दल पंतप्रधानांकडं बोलायला ते विसरले. मुख्यमंत्र्यांना बेकायदेशीर खाणींमध्ये खूप रस आहे, आणि ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, असा टोला सरदेसाईंनी हाणलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!