मगोपचे जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर चर्चेत

आरोलकर विरुद्ध सोपटे, तर आर्लेकर विरुद्ध आजगावकर यांच्या राजकीय युद्ध

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघातून मगोचे नेते आणि संभाव्य विधानसभेचे उमेदवार जीत आरोलकर आणि प्रवीण आर्लेकर हे बरेच चर्चेत आले आहेत. जीत आरोलकर विरुद्ध आमदार दयानंद सोपटे, तर प्रवीण आर्लेकर विरुद्ध उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यामध्ये सध्या राजकीय युद्ध चालू आहे. आरोप प्रत्यारोप करत हे नेते सध्या प्रकाश झोतात आहेत. यामुळे जनतेचं छान मनोरंजन होतंय.

हेही वाचाः72 तासांतले कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट नसल्यास गोव्यात प्रवेश नाही

केवळ विरोधक म्हणून त्यांच्यावर टीका

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारातील आमदार कार्यरत आहेत, तर दुसऱ्या बाजूने सरकार आणि आमदार आपले विरोधक समजतात तेही कोरोना विरोधात उल्लेखनीय कार्य करतायत. अशा व्यक्तींमध्ये जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर, राजन कोरगावकर, सचिन परब यांचं कार्य उल्लेखनीय आहे. आमदारांनी एकदाही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं, ना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलीये. केवळ ते आपले विरोधक आहेत म्हणून त्यांच्यावर राजकीय हेतूने टीका करून राजकारणाचा रंग देण्यात आमदार मंडळी व्यस्त आहेत.       

हेही वाचाः तुये परिसरात १५०० झाडांची लागवड            

मांद्रे मतदारसंघ

मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे हे सरकारच्या माध्यमातून आणि वैयक्तीक पातळीवर मतदारसंघात कार्य करतायत. ते मंत्री असते तर आणखी जोमाने काम केलं असतं त्यांना सरकारच्या निधीवर अवलंबून राहावं लागतंय. कुठेतरी विरोधकांना चपराक बसावी यासाठी त्यांचे काही समर्थक त्यांच्या कार्याला राजकारणाचा रंग देतायत. आमदार सोपटेंना मंत्रिपदासाठी भाजपने हुलकावणी दिली. कार्यकर्ते नाराज बनले.पण तेही काही करू शकत नाही. सध्या मगोचे संभाव्य उमेदवार जीत आरोलकर आणि आमदार सोपटेंमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. 2019 साली पोट निवडणुकीत भाजपच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहुन साडे नऊ हजार मतं आरोलकरांनी प्रथमच घेतली होती. तेव्हापासून सोपटे आणि आरोलकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं ते आजपर्यंत सुरू आहे. सोपटेंप्रमाणे आरोलकर आणि सचिन परब आपल्या पद्धतीने, स्वतःची पदरमोड करून मतदारसंघातील लोकांची मदत करत आहेत. आरोलकरांनी सरकारकडे कोरोना विलगिकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागितली. परंतु सरकारने काना-मनावर घेतलं नाही. अखेर 20 खोल्याचं हॉटेल भाडेपट्टीवर घेऊन तिथं आरोलकरांनी कोविडबाधितांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून डॉक्टरांची सोय केली. मात्र मधेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी तुये हॉस्पिटलला भेट देऊन यापुढे कुणालाही होम कॉरंटाईन होता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच ज्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्यांना पेडण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठण्याची सूचना करून एक प्रकारे आरोलकरांना चपराक दिली.

बियाणी-खतं वाटप

आमदार सोपटे मागील दोन वर्षांपासून मांद्रे मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोफत खतं आणि बियाणी वितरित करतात. शेतीसाठीही प्रोत्साहन देणाऱ्या योजना ते खाजगी पैशातून राबवतात. या योजनांचा अनेकांनी लाभ घेतला. यंदाही ती योजना सुरू केली आणि केरीतून योजनेचा शुभारंभ केला. त्यावेळी या योजनेतून जीत आरोलकरांच्या समर्थकांना वागळल्याचा आरोप सोपटेंवर झाला. तसा व्हिडिओ वायरल झाला, ज्यात आरोलकर समर्थक आणि आमदार सोपटे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक झालेली दिसून आली. लगेच आरोलकरांनी सर्वपक्षाच्या शेतकऱ्यांना मोफत बियाणी आणि खतांचं वितरण करण्याची योजना त्याच केरी गावातून सुरू केली.

हेही वाचाः अपघातामुळे दुचाकी चोरटा गजाआड

पेडणे मतदारसंघ

पेडणे मतदारसंघातून सध्या मगोचे प्रवीण आर्लेकर यांनी जनतेसाठी विविध योजना राबवल्या आहेत. जिथे अन्याय होतो तिथे ते आवाज उठवतात, मदत कार्य सुरू करतात. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याविरोधात ते बोलतात आणि मग आजगावकर यांचे समर्थक प्रवीण आर्लेकरांवर टीका करतात. मात्र बाबू आजगावकर भाष्य करायला विलंब लावतात. पाणी समस्या असलेल्या या मतदासंघात टँकरद्वारे आर्लेकर पाणी पुरवठा करतात. आजगावकरांच्या समर्थकांनी कोरोना काळात पेडणे मतदारसंघात भरीव कामगिरी केली हे नाकारून चालणार नाही. आर्लेकर थेट समाजकारणात राजकारण घुसवतात असा आरोप आजगावकर समर्थकांचा आहे.

एकंदरीत पेडणे तालुक्यात जीत आरोलकर आणि प्रवीण आर्लेकर यांनी मगो पक्ष सध्यातरी टिकून ठेवलाय एवढं मात्र नक्की.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!