गोवेकरांना आता मगोपचाच पर्याय, ढवळीकरांची भाजप-काँग्रेसवर चौफेर टीका

कोविड 19, म्हादई या व इतर प्रश्नांवर सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोणाचा ताळमेळ कोणाला नाही. सरकारी धोरणांमध्ये सुसूत्रता नसल्याचा ढवळीकरांचा आरोप.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: कोविड 19 महामारी, म्हादई, प्रशासन या सर्व आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी केलीय. गोवेकरांसाठी आणि खासकरुन युवकांसाठी आता मगोपच एकमेव पर्याय असल्याचं मत आमदार सुदिन ढवळीकरांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना मांडलं.

सरकार प्रशासन हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरलंय. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सामान्य गोवेकरांना बसत असल्याचं ढवळीकरांनी सांगितलं. सरकारच्या या गलथान कारभाराला लोक कंटाळले असल्याचही ढवळीकर म्हणाले.

अपुऱ्या सरकारी यंत्रणेमुळे कोविडचे मृत्यू वाढले
कोविड 19 मुळे गोव्यात दिवसेंदिवस मृत्यूत वाढ होत आहे. सरकारला कोविड 19 कडे लक्ष देण्याऐवजी सत्ता महत्त्वाची वाटते, असा आरोप सुदिन ढवळीकरांनी केला. खाटा, इंजेक्शन, व्हेंटीलेटर, हाय फ्लो व्हेंटीलेटर यांच्या कमतरतेमुळे मृत्यू होत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात कोविड मृत्यूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप ढवळीकरांनी केला.

मगोप नव्हे, म्हादईच्या प्रश्नाला काँग्रेस-भाजप जबाबदार
म्हादईच्या प्रश्नाला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष जबाबदार आहेत असल्याची टीका ढवळीकरांनी केली. भाजपाच्या केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशींनी गोव्याला विकलं, असा थेट आरोप ढवळीकरांनी केलाय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता काहीही करू शकत नाहीत. सत्तरीसह आता सांगे आणि धारबांदोडा भागालाही म्हादईच्या पाणी पातळीचा फटका बसू लागला आहे. 1978 पर्यंत मगो सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवू दिले नाही, असा दावा ढवळीकरांनी केलाय.

गोव्यातील तरुण रक्ताने मगोपला सत्तेवर आणावे
गोव्यात एकही योजना नीट राबविली जात नाही, असा आरोप ढवळीकरांनी केला. सरकारचा सगळा अंदाधुंद कारभार सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किती वर्षांचा रहिवासी दाखला असावा, यावर एकमत नाही. सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोपही होत आहेत, अशा परिस्थितीत आता मगोपशिवाय पर्याय नसल्याचे ढवळीकर म्हणाले. गोव्यातील युवा रक्ताने यावेळी मगोपला सरकार स्थापनेची संधी दिली पाहिजे, असे आवाहन ढवळीकरांनी केले आहे. गोव्याच्या सर्व क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचे श्रेय मगोपलाच जात असल्याचेही ढवळीकरांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!