मगोपच्या ‘या’ नेत्याने केला फोंड्यातील उमेदवारीवर दावा

विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार. उमेदवारीसंदर्भात पक्षाच्या केंद्रीय समितीचा निर्णय करणार मान्य.

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या मगो पक्षाच्या तिकिटावर आपला दावा आहे. त्यादृष्टीने आपले कामही सुरू आहे. मात्र आपल्या उमेदवारी संदर्भात फोंड्यातील कार्यकर्त्यांनी व मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने निर्णय घ्यायचा आहे. केंद्रीय समितीचा निर्णय आपणास मान्य असेल. मात्र फोंडा मगोमय करण्याच्या दृष्टीने सुरू असलेले आपले प्रयत्न कायम राहतील, असे मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर (Ketan Bhatikar) यांनी सांगितले.

फोंडा उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर पलटवार करण्यात मोलाची भूमिका बजावलेले डॉ. केतन भाटीकर पुढे म्हणाले की, आपणास फोडाफोडीचे राजकारण करण्यात रस नाही. भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या भाजप नगरसेवकांनी स्वखुशीने मगो उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भाजपने वेगवेगळ्या पक्षांतून आयात केलेले आमदार, नगरसेवक यांना खूश करण्यासाठी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखावले आहे. ढवळीकर बंधूंवर घराणेशाहीचा आरोप करणार्‍या भाजपने काँग्रेसमधून मोठ्या आनंदात भाजपात प्रवेश केलेल्या आनंद नाईक यांचा कसा घात केला, हे फोंड्यातील जनतेने पाहिले आहे. भाजपला जनता कंटाळली आहे, हे फोंडा पालिकेतील निकालावरून सिद्ध झाले आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीच मुख्यमंत्र्यांकडून रोजगाराचे गाजर
गेल्या जानेवारीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी 5 हजार रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नऊ महिन्यांनंतर अद्याप एकही रोजगार निर्माण झालेला नाही. आता जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बेरोजगार तरुणांना पुन्हा रोजगार निर्मितीचे गाजर दाखवत आहेत. मात्र जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही, हे फोंड्यातील उपनगराध्यक्ष निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, असेही डॉ. भाटीकर म्हणाले.

भाजपने शहरवासीयांना वार्‍यावर सोडले!
सध्या फोंडा शहर आणि मतदारसंघाची परिस्थिती बिकट बनली आहे. मोठा गाजावाजा करून शहरात ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. फोंड्यात भरदिवसाही चोर्‍यांचे प्रकार वाढले आहेत, खून होत आहेत. करोना लॉकडाऊन काळात तर भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कचर्‍याचा ढीग पडला आहे. जनतेला भेडसावणार्‍या या समस्यांकडे भाजपचे कोणतेही लक्ष नाही. भाजपने शहरवासीयांना वार्‍यावर सोडल्यासारखे आहे, असा आरोपही डॉ. भाटीकर यांनी केला.

पंचायत पातळीवरही कारवाई करून दाखवा!
उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपशी प्रतारणा करून मगो पक्षाला सहकार्य केलेल्या नगरसेवकांवर पक्ष पातळीवरून कारवाई करण्याचा भाजप मंडळ अध्यक्षांनी इशारा दिला आहे. याबाबत डॉ. भाटीकर म्हणाले, सदर नगरसेवक भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळेच त्यांनी मगोच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ते कोणत्याही कारवाईला घाबरणारे नाहीत. भाजपने कारवाईचा हाच निकष पंचायत पातळीवरही लावावा आणि तेथेही अशीच कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही डॉ. भाटीकर यांनी दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!