पर्वरी-मेरशी मार्गावर दुसऱ्या दिवशीही ‘मेगाब्लॉक’!

वाहनांच्या रांगा; चालक संतप्त, मार्च अखेरपर्यंत अटल सेतू बंदच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रस्त्याच्या कामासाठी पणजीतील अटल सेतू पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे महामार्गावर पर्वरी ते मेरशीपर्यंत सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका वाहनचालकांना बसला. अटल सेतू २७ मार्चपर्यंत बंदच राहणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस वाहनचालकांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून राजधानी पणजीत कामे सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणचे रस्ते खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे पणजीत दिवसा-रात्रीही वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी अटल सेतूवरील रस्त्याच्या कामासाठी हा पूलच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांना पुलाखालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने पर्वरी ते मेरशीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

पणजीतील कामांप्रमाणेच अटल सेतूवरील रस्त्याचे काम सुरू करताना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला. परंतु, त्यानंतर प्रशासनाने मार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडीचा धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या कोणत्याही उपाययोजना तेथे राबवल्या नाहीत. किंबहूना वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुरेशा वाहतूक पोलिसांनाही तेथे तैनात करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालकांना अनेक तास रांगेत अडकून पडावे लागले. त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागला. सरकार आणि प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचा वाहनचालकांना सोमवारनंतर मंगळवारीही दणका बसला. अटलसेतू २७ मार्चपर्यंत बंद असणार असल्याने पुढील सहा दिवस रोजच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागून त्यांच्या रागाचा पारा चढण्याची शक्यता आहे.

रुग्णवाहिका अडकली !

अटलसेतू बंद असल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत मंगळवारी एक रुग्णवाहिका तब्बल ४० मिनिटे अडकून पडली. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकार आणि प्रशासनावर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली आहे. आपत्कालीन वाहनांसाठी महामार्गावर वेगळ्या लेनची गरज असते. परंतु, भाजप सरकारने कमिशन मिळवण्यासाठी घाईघाईने रस्ते बांधल्यामुळे आज ही​ परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी टीका आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केली.

पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी

वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी व बाणास्तरीकडून पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांवर सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत बंदी घालण्यात आलेली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केला. सावंतवाडीतून येणारी वाहने बांदा येथे, तर बाणास्तरीकडून येणारी वाहने पुलावरून वळवण्याचे निर्देश देत, २७ मार्चपर्यंत आदेश लागू असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

राजधानीत कंत्राटदारांचा मनमानी कारभार सुरूच

* स्मार्ट सिटीचे काम करणारे कंत्राटदार प्रशासन तसेच पणजी महानगरपालिकेलाही जुमानत नाहीत. आपल्या मर्जीप्रमाणे त्यांचे काम सुरू आहे. त्याचा फटका नागरिक आणि वाहनचालकांना बसत आहे, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!