म्हापशात माटोळीचा बाजार मार्केटमध्ये भरणार

पालिका कार्यालयातील बैठकीत निर्णय

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कोरोनामुळे येथील बाजारपेठेतील व्यवसाय मंदावला आहे. व्यवसायिकांना उभारी देण्यासाठी यंदा चतुर्थीचा माटोळी बाजार इतरत्र हलविण्यापेक्षा मार्केटमध्ये भरविण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला. पण लोकांच्या सूचनांच्या आधारावर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं.

हेही वाचाः हळदोणात चित्रपट चित्रीकरणास कोमुनिदादचा विरोध

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

बुधवारी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली चतुर्थीच्या पूर्वतयारी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पालिका कार्यालयात बैठक झाली. यावेळी अग्नीशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, माजी नगरसेवक तुषार टोपले, सहाय्यक अभियंता नॉर्मन आताईद, म्हापसा पोलीस उपनिरीक्षक विभा वळवईकर, मामलेदार कार्यालय व वाहतुक पोलिस विभागाचे प्रतिनिधी, तसंच नगरसेवक उपस्थित होते.  

प्रभाग निहाय गणपती विसर्जनासाठी वेळापत्रक

या बैठकीत प्रभाग निहाय गणपती विसर्जनासाठी वेळापत्रक ठरविण्यात आलं. प्रभाग 9,10,13,19 मधील लोकांनी संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत, तर प्रभाग 14,15,16,17,18 यांना संध्याकाळी सात ते 8 पर्यंत, प्रभाग 5,6,11,12 यांना रात्री 8 ते 9 पर्यंत आणि प्रभाग 3, 7, 20 साठी रात्री 9 ते 10 पर्यंत वेळ असेल. तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळेचे बंधन असेल. हे तात्पुरतं वेळापत्रक असून नंतर यावर अंतिम निर्णय होईल, असंही या बैठकीत ठरलं.

हेही वाचाः चिखली येथे रेती उत्खनन; गुन्हा दाखल

गर्दी टाळण्यासाठी नियोजन

प्रभागांमध्ये काही विहिरी आहेत. या विहिरी विसर्जनासाठी दिल्यास तिथेही श्रींचं विसर्जन केलं जाईल. तार नदीवर गर्दी होणार नाही, यासाठी हे नियोजन असेल. या विहिरी पालिकतर्फे साफ केल्या जातील, असं नगराध्यक्षांनी सांगितलं. शिवाय श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील शेतात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने उभारला जाईल, असं नगराध्यक्षांनी सांगितलं.

हेही वाचाः गोव्यात जानेवारी ते जून या काळात 1,831 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित

गणेश विसर्जनासाठी आठ सार्वजनिक ठिकणांची निवड

गणेश विसर्जनासाठी पालिकेने सार्वजनिक आठ ठिकणांची निवड केली आहे. तसंच काणका-बांध हे अतिरिक्त ठिकाण आहे. बोडगिणी इथे कृत्रिम तलावाची व्यवस्था असेल. आराम सोडा याठिकाणी फटाक्यांची दुकाने असतील अधिकतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना यंदाही बगल दिली आहे. फक्त धार्मिक विधी होतील. सामाजिक अंतराचं पालन करून भक्तांना देवदर्शन करण्यास अनुमती असेल, असं नगराध्यक्षांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः MGP OFFICE IN MORJIM | मांद्रे मतदारसंघात मोरजी इथं मगो कार्यालयाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!