गोव्यात मास्क सक्ती होणार? हे आहे कारण…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : चौथी लाट येणार की नाही, या विषयी अंदाज बांधणे कठीण आहे. देशात जून महिन्यात चौथी लाट येईल, असा अंदाज आयआयटी कानपूर संस्थेने व्यक्त केला आहे. आयआयटी कानपूर संस्थेने यापूर्वी वर्तवलेले अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज आहे. पावसामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतात.
नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता
करोनाच्या तिसरी लाट संपली असली तरी चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून जुलैपर्यंत मास्क वापरणे फायद्याचे ठरेल. करोनाविषयी काळजी घण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत २७ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता आहे.
काळजी घेण्याची आवश्यकता
करोनाविषयक तज्ज्ञ समितीची बैठक नुकतीच पार पडली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ही माहिती दिली. करोनाचा बुस्टर डोस खासगी हॉस्पिटलांमध्ये उपलब्ध आहे. हा डोस सरकारी हॉस्पिटलांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याला हरकत नाही, अशी सूचना काही सदस्यांनी केली. कोणतीही लाट गेल्यानंतर त्याचा परिणाम चार महिने असतो. लाट पुन्हा येण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये संपली. त्यामुळे जुलैपर्यंत मास्क वापरणे फायद्याचे ठरेल, असेही डॉ. बांदेकर म्हणाले.
कोविडचा नवा विषाणू नाही
गोव्यात वा देशात करोनाचा नवा विषाणू नाही. जीनोम सिक्वेंसिंग मशिन आहे. आवश्यकता भासल्यास त्याचा वापर केला जाईल. नवा विषाणू नसल्याने चौथ्या लाटेची सध्या तरी शक्यता नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कोविडविषयी नवीन धोरण ठरवले जाणे शक्य आहे, असेही डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले.
लसीकरण मोहीम सुरूच राहणार
लसीकरण मोहीम सुरूच राहणार आहे. ज्येष्ठ तसेच गंभीर आजार असलेल्यांनी तिसरा डोस घेणे आवश्यक आहे. काही जणांनी तर करोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत. त्यांनी आरोग्य केंद्रात येऊन डोस घ्यावेत, अशी सूचनाही तज्ज्ञ समितीने केली आहे.