मडगावातील न्यू मार्केट ग्राहकांविना सुनेसुने

मार्केटमधील दुकाने खुली ठेवण्याबाबत संभ्रम, अंतिम निर्णय घेण्यासाठी आज बैठक

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनबाबत जारी करण्यात आलेल्या नियमावलीत मासळी मार्केट, पालिका मार्केट यांना सर्व नियम पाळून मार्केट खुले ठेवता येईल, असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच मार्केटमधील ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचं दिसून आलं. तसंच काही दुकानदारांनी दुकानं बंद ठेवण्याचा तर काहींनी खुली ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं व्यावसायिकांत संभ्रम असल्याचं दिसून आलं. याविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी न्यू मार्केट संघटनेची बैठक होणार आहे.

हेही वाचाः १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला होऊ शकतो उशीर?

सर्व प्रकारची काळजी घेत दुकानं खुली

मडगाव येथील गांधी मार्केट, न्यू मार्केटमधील दुकाने सुरू राहणार का, याबाबत सकाळपासून अनेकांकडून दुकानदारांना विचारणा करण्यात येत होती. काही दुकानदारांनी गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत खूप नुकसान झालेलं असून यावेळी कोणतीही जोखीम न घेता सर्व प्रकारची काळजी घेऊन दुकान सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसंच मार्केटमधील इतरांनाही दुकान बंद ठेवण्याचा वा खुले ठेवण्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सांगितलं.

हेही वाचाः परप्रांतीय कामगारांच्या ‘घर वापसी’मुळे चिंता वाढली

कोरोनामुळे भीती

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्केटमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. सध्या मडगावात वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये येण्यास नागरिक घाबरत आहेत. जीव धोक्यात व्यवसाय करण्यापेक्षा सरकारने केलेल्या लॉकडाऊनला पाठिंबा देत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं काही दुकानदारांनी सांगितले.

हेही वाचाः मडगावात १९ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू

व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावं.

व्यावसायिकांमध्ये असलेल्या संभ्रमाविषयी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांना विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊनबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. पालिकेकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावं.

हेही वाचाः कुणावरही अशी वेळ येऊ नये! पण आलीच तर त्यासाठीची प्रक्रिया सुलभ करत आहोत

न्यू मार्केटचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणतात

वैयक्तिकरीत्या मी दुकान बंद ठेवणार आहे. संघटननेतर्फे शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल. राज्यात बाधितांची संख्या वाढत असताना राज्य सरकारकडून आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे. राज्याच्या सीमा बंद करून चाचणी अहवाल असल्याशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!