तेव्हा माणूसकीचा सुद्धा खून झाला…

व्हायरल व्हिडिओमुळे कटू वास्तव समोर, मदतीसाठी 3 महिला आल्या धावून, तिघे संशयित पोलिसांना आले शरण,

अजय लाड | प्रतिनिधी

मडगावः याआधी आपण सारेच एकमेकांशी थेट जुळलेले होतो, आणि आता केवळ समाजमाध्यमांपुरतेच एकमेकांच्या जवळ राहिलेलो आहोत. मडगावातील खुनाची घटना ही याच गोष्टीची जाणीव करून देणारी ठरली आहे. मरणाच्या दारात उभा असलेल्या माणसाची धडपड व कंबरेवर हात ठेवून त्याला पाहत राहणारे डोळे… व्हायरल झालेल्या व्हिडिओने गुन्हेगारांपेक्षा माणुसकीचा खून झाल्याची घटना सर्वांसमोर आणली आहे.


सीसीटीव्हीचा प्रश्न ऐरणीवर
मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात, आजूबाजूला दुकाने असलेल्या अगदी गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगारांकडून स्वप्निल वाळके (Swapnil Walke) या सराफाचा खून करण्यात आला. घटनास्थळापासून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर दक्षिण गोवा पोलिस मुख्यालय आहे. तरीही गुन्हेगारांकडून सराफी व्यावसायिकाच्या दुकानात घुसून थेट त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याची घटना घडली. घटनेनंतर जखमी अवस्थेतील स्वप्निलवर वेळेत उपचार झाले नसल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत पायऱ्यांवर बसलेल्या स्वप्निलला पोलिस आल्यानंतर त्यांच्याच गाडीतून हॉस्पिसिओ इस्पितळात नेण्यात आले. इस्पितळात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे जाहीर केले. घटनास्थळावर दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधीक्षक, मडगावचे पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पोलिस, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस हजर झाले व शोधकार्याला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळावर झालेल्या झटापटीत गुन्हेगारांची दुकानात पडलेली पिस्तुल पोलिसांना सापडली. गुन्हेगाराचा टीशर्ट व हातमोजा याशिवाय सुरीचे पाकिटही आढळून आले. श्वान पथकाला बोलावून गुन्हेगारांचा तपास घेण्याचा करण्यात आलेला प्रयत्नही सफल झाला नाही. फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील हातांचे ठसे व इतर पुरावे गोळा केले. घटनेच्या रात्रीच गुन्हा शाखेच्या पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेत मडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व दुसऱ्या दिवशी तिसरा संशयित एन्काउंटरच्या भीतीने गुन्हा शाखेच्या पोलिसांपासून बचाव करत मडगाव पोलिसांकडे शरण आला. यानंतर तिसऱ्या दिवशी आणखी एका संशयिताला गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दरम्यान, मडगाव पोलिसांकडून हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने यात आणखी बरेच काही असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. एकीकडे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा, भिकाऱ्यांचा प्रश्न, अवैध धंदे, वाढती झोपडपट्टी व त्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे वास्तव्य या प्रश्नांनाही वाचा फुटू लागली. या गुन्हेगारांना पकडल्यानंतर पुढील तपासही होईल व गुन्ह्यामागील हेतूही पुढे येईल.

आपल्याच वर्तुळात गुरफटलेला समाज
मात्र, या खुनाच्या घटनेच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे माणुसकीचा झरा कसा आटत चाललाय याचेच उदाहरण दिसून आले. मारेकऱ्यांनी स्वप्निलच्या छातीवर गोळी झाडली होती व त्याच्या हातावर व पोटात खोलवर चाकूने वार केले होते. रक्तबंबाळ अवस्थेतही स्वप्निलने मारेकऱ्यांना पकडण्याचा चालवलेला प्रयत्न त्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे अयशस्वी ठरला. नागरिकांनीही चाकू घेऊन धावणाऱ्या मारेकऱ्यासह त्याच्या साथीदाराला पकडण्याऐवजी काय चालले आहे ते पाहत बसणे पसंत केले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत दुकानाबाहेर बसलेल्या स्वप्निलच्या मदतीला तीन महिलांव्यतिरिक्त कुणीही धावले नाही. त्याला योग्यवेळी उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. आपण, आपले काम व आपले घर, याच वर्तुळात गुरफटलेला समाज डोळ्यादेखत घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. समाजातील एका व्यक्तीवर आलेले संकट उद्या आपल्यावरही येऊ शकते, त्यामुळे सतर्क राहण्याचे भानही विसरलेला समाज आता दिसू लागलाय. समाजमाध्यमाच्या आभासी जगातून बाहेरच्या वास्तव जगात येण्याची हीच वेळ आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!