भाजप सरकारचं बेवारशी मृतदेहांकडे दुर्लक्ष!

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची टीका

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

मडगाव : डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या दिवाळखोर भाजप सरकारकडे मडगावच्या शवागारातील बेवारशी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी नाही, हे वास्तव महाभयंकर आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी त्वरित या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश द्यावेत. मी स्वत: त्या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलण्यास तयार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारने मडगाव नगरपालिकेला बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी न दिल्याने शवागारात कित्येक बेवारशी तसेच कोविड बाधा झालेले मृतदेह पडून आहेत, हे ऐकून मला धक्काच बसला. गोव्यात मृतांची संख्या वाढत असून काल दुपारपर्यंत मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे सर्व चौथरे भरलेले होते. सरकारने एकंदर परिस्थितीबद्दल संवेदनशीलपणे वागणे गरजेचे आहे, असे कामत म्हणाले.

गेल्या वर्षी मठग्रामस्थ हिंदू सभेचे स्व. नारायण पै फोंडेकर यांच्या सहकार्याने मी मडगाव स्मशानभूमीत कोविडची बाधा झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्था केली होती. सरकारने आता बेवारशी तसेच कोविड लागण झालेल्या मृतदेहांवर वेळेत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व सबंधितांना विश्वासात घेऊन कोविडच्या सद्यस्थितीवर योग्य उपाय योजना काढणे गरजेचे आहे. गोव्यातील कोविडचा वाढता संसर्ग तसेच दगावणारे रुग्ण यांची दखल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!