मराठी-कोकणीतील दरी ठाले पाटलांमुळे वाढली…

दामोदर मावजो; मराठीप्रेमींना भाषावादाशी काहीही देणेघेणे नसल्याचाही दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी


पणजी :
 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी-कोकणी वादाबाबत जी वक्तव्ये केली, त्याबाबत उपस्थित मान्यवर आणि साहित्यिकांनीही नाराजी व्यक्त केली. मुळात मराठीप्रेमी आणि साहित्यिकांना गोव्यातील भाषावादाशी काहीही देणेघेणे नाही. ठाले पाटलांच्या वक्तव्यांमुळे मराठी-कोकणीतील दरी आणखी वाढली, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार लेखक दामोदर मावजो यांनी शनिवारी प्रुडंट वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केली.
हेही वाचाःगोयकारांना वीज दरवाढीचा शॉक!…

मराठी-कोकणीबाबत जे सांगितले ते अर्धसत्य

मराठीत लोकभाषांचा आदर केला जातो, याची खात्री असल्यामुळेच आपण प्रमुख पाहुणे या नात्याने ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावली. मला ऐकण्यासाठी तेथील श्रोते उत्सुक होते, हे माझ्या भाषणावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कौ​तिकराव ठाले पाटील गोव्यातील मराठी-कोकणी वादावर बोलतील, असे मला अजिबात वाटले नव्हते. परंतु, ठाले पाटील त्या विषयावर आल्यानंतर मलाही आश्चर्य वाटले. त्यांनी गोव्यातील मराठी-कोकणीबाबत जे सांगितले ते अर्धसत्य होते, असे मावजो म्हणाले.
हेही वाचाःभारतात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता! हे आहे कारण…

कोकणी भाषा ७०० वर्षांपूर्वीपासून बोलली जाते

गोव्यात कोकणी भाषा ७०० वर्षांपूर्वीपासून बोलली जाते. अगदी संत नामदेवांनीही गोव्यात येऊन कोकणीतून गवळण लिहिली होती. त्यामुळेच प्रसिद्ध गोमंतकीय कवी बा. भ. बोरकरही​ संत नामदेवांना कोकणी कवितेचे आद्यकवी म्हणत होते. बोरकरांनी साहित्य मराठी भाषेतूनच लिहिले. परंतु, आपली मातृभाषा कोकणी असल्याचे ते कधीही विसरले नाहीत. किंबहुना त्यांनी त्याबाबत कधीही तडजोड केलेली नव्हती. हेच मुद्दे आपल्याला नंतर पटवून द्यायचे होते. पण, तितका वेळ आपल्याला मिळाला नाही. त्यासाठीच आपण कौतिकराव ठाले पाटलांना याबाबत परिसंवादाचे आयोजन करून मला माझी भूमिका मांडण्यास देण्याचे आवाहन मी केले आहे, असे मावजो यांनी सांगितले.
हेही वाचाःवीज खात्यातील रखडलेले ‘हे’ अर्ज उद्यापर्यंत निकालात काढणार…

दामोदर मावजो म्हणतात…

– महाराष्ट्रातील विशेष करून मराठवाड्यातील मराठी साहित्य रसिकांना गोव्यातील मराठी-कोकणी वादाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे कौतिकराव ठाले पाटलांची भूमिका कोणालाही आवडली नाही.
– गोव्यात आम्हाला पुन्हा एकदा भाषावाद उकरून काढायचा नाही. हा वाद कायमचा मिटवण्यासाठी जास्तीत जास्त संवादावर भर हवा. त्यासाठीच पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन गोव्यात करावे. आम्ही कोकणी आणि मराठीप्रेमी एकत्रितपणे हे संमेलन यशस्वी करून दाखवू असे, आवाहन मी आयोजकांना केले आहे.
– शंभर टक्के गोंयकार कोकणीतूनच बोलतात. महाराष्ट्रातून गोव्यात आलेले आणि स्थायिक झालेले मराठीतून बोलतात. त्यांना आमचा अजिबात आक्षेप नाही.
– शंभर टक्के गोंयकार कोकणी बोलतात म्हणून गोव्याची राजभाषा कोकणी आहे. शंभर टक्के महाराष्ट्रीयन मराठी बोलतात. गुजरातहून आलेले गुजराती बोलतात. मग महाराष्ट्राची राजभाषा गुजराती म्हणता येईल का?
हेही वाचाःसरकारची आव्हान याचिका स्वीकारली!…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!