आधी कर्जबाजारी झाला, मग आपल्याच सहयोगी चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले

म्हापसा येथील चोरीप्रकरण; 2 सप्टेंबर रोजी केली चोरी; श्वानांच्या शर्यतीवर सट्टे लावून गमावले पैसे!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: श्वानांच्या शर्यतींवर सट्टा लावून कर्जबाजारी झालेल्या संशयित किरण जाधव (२२, रा. हुपरी, जि. कोल्हापूर) याने आपल्याच सहयोगी चांदीच्या व्यापार्‍याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पोलीस चौकशीतून समोर आला.

हेही वाचाः स्वप्नील परबवरील हद्दपारीची कारवाई न्यायालयाकडून रद्द

चोरीची ही घटना २ सप्टेंबर रोजी घडली

चोरीची ही घटना २ सप्टेंबर रोजी घडली होती. मद्य, जुगार, चोरी, हिंसा, वेश्यागमन ही पाच अशी व्यसने आहेत की, यातील एकाचा जरी अतिरेक झाला तर इतर चार त्याच्या पाठोपाठ येतात आणि मनुष्याचे आरोग्य, धन, यश, कीर्ती धुळीस मिळते. याचं ताजं उदाहरण म्हापसा येथील चोरी प्रकरणातील संशयिताच्या कारनाम्यातून समोर आले आहे. २ सप्टेंबर रोजी मंगेश खांडेकर (रा. हुपरी, जि. कोल्हापूर) या सहयोगी चांदीच्या व्यापार्‍याची ५ लाख रुपयांची रोकड चोरून संशयित किरण पसार झाला होता.

खांडेकर हे चांदीचे व्यापारी आहेत. ते चांदीची ऑर्डर घेण्यासाठी गोव्यात आले होते. त्यांनी आपल्यासोबत प्रणव ऊर्फ योगेश काजवे व संशयित किरण यांना आणले होते. खांडेकर यांनी चांदीची ऑर्डर घेऊन त्यासाठी सराफ्यांकडून ५ लाख रुपयांची रक्कम आगाऊ घेतली होती. ही रक्कम त्यांनी राजवाडा-म्हापसा येथे आपल्या फ्लॅटवर ठेवली होते. अजून ऑर्डर घेण्यासाठी ते डिचोलीला निघाले असता संशयित विश्रांतीचे कारण सांगून फ्लॅटवरच थांबला. खांडेकर गेल्यानंतर त्याने संधी साधून फ्लॅटचा बेडरूम फोडून ती ५ लाखांची रोकड घेऊन तो पसार झाला. खांडेकर यांच्या तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी संशयिताला निपाणी (कर्नाटक) येथे पकडून गजाआड केले.
म्हापसा पोलिसांनी संशयिताने चोरलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये जप्त केले आहेत. इतर रक्कम त्याने कर्जदारांना वाटली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचाः सोनू यादवला गोळी मारली कोणी?

श्वानांच्या शर्यतीवर लावतात सट्टे!

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी व आसपासच्या गावांत श्वानाच्या शर्यती लावल्या जातात. या शर्यतीत श्वानाला मोटारसायकल किंवा कारच्या मागे पळायला लावले जाते. या शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. या सट्ट्यात संशयित किरण कर्जबाजारी झाला होता. कर्ज देणारे लोक पैसे परत घेण्यासाठी त्याच्यामागे लागले होते. हे कर्ज कसे फेडावं, या विवंचनेत होता. याच विवंचनेतून त्याने सहयोगी खांडेकर यांनाच लुटलं.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!